मीरा रोड येथील घटना

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर अधिक वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मीरा रोड येथील पूनम सागर परिसरातील  १२ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यात जखमी झाला आहे.

पालिका प्रशासनाकडून उत्तनमध्ये लसीकरण आणि निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. यासाठी ‘माय वेट चॅरिटेबल ट्रस्ट‘या संस्थेला कंत्राट  देण्यात आलेले आहे. शहरातील मोकाट जनावरांचे निर्बिजीकरण करणारी मिरा भाईंदर महानगरपालिका ही राज्यातील दुसरी महानगरपालिका आहे.

त्यामुळे शहरातील जनावरावर उपचार आणि त्यांवर नियंत्रण मिळवण्याकरिता युद्ध पातळीवर काम करण्यात येते. मात्र, महिन्याभरापासून कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण रखडल्यामुळे रस्त्यावर कुत्र्यांची दहशत वाढल्याची तक्रार करण्यात येत आहे.  मीरा रोडच्या पूनम सागर गृहसंकुलातील संकल्प इमारतीत राहणारा पुष्कर विश्वकर्मा हा १२ वर्षीय मुलगा मित्रांसोबत इमारतीखाली क्रिकेट खेळत भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यात तो जखमी झाला.

दरम्यान, शहरातील भटक्या कुत्र्यांवरील लसीकरण आणि निर्बीजीकरण बंद होते. येत्या आठवडय़ात ते सुरू केले जाणार असल्याची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम निराटले यांनी यावेळी दिली.

भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची गती करोना काळात मंदावल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र, करोना काळातील टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर ही केंद्रे पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर महानगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.