अपघातात जखमी झालेल्या मुलाला घेऊन पित्याच्या चार तास विविध रुग्णालयांत फेऱ्या

टँकरच्या धडकेत जखमी झालेल्या ११ वर्षांच्या मुलाला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर या मुलाचे वडील त्याला कडेवर घेऊन विविध रुग्णालयांत फिरत होते, मात्र कुणीही त्याला दाखल करून घेतले नाही. उपचार करण्यास नकार देत प्रत्येक रुग्णालयाने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. अखेरीस असंवेदनशील व्यवस्थेमुळे या मुलाला मृत्यूला कवटाळावे लागले. या मुलाला दाखल करून न घेतलेल्या रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी मंगळवारी स्थायी समितीत करण्यात आली.

नालासोपाऱ्यात राहणारा निषाद घाडी हा मुलगा पाचवीत शिकत होता. शनिवारी त्याचे वडील त्याला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मात्र पाच मिनिटे उशीर झाल्याने शाळेने त्याला वर्गात बसू न देता परत पाठवले. त्यामुळे निषाद वडिलांबरोबर घरी निघाला. निषादच्या वडिलांचा लोखंडी उपकरणे पुरवण्याचा व्यवसाय आहे. काही ग्राहकांना ही  उपकरणे देऊन ते घरी जाणार होते. नालासोपारा पूर्वेच्या विजयनगर येथील एका दुकानासमोर त्यांनी निषादला दुचाकीबरोबर उभे केले आणि ते सामान देण्यासाठी दुकानात गेले. त्यावेळी भरधाव आलेल्या एका टँकरने निषादला धडक दिली. त्यात तो जखमी झाला. चिमुकल्याचा आर्त टाहो ऐकून त्याचे वडील धावत आले. निषादला उचलून त्यांनी जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र तिथे दाखल करून घेण्यास नकार आल्याने त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात धाव घेतली. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांना नकार देण्यात आला. प्रत्येक रुग्णालयाने उपचार न करताच दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला, असा आरोप निषादच्या कुटुंबीयांनी केला आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने अखेर जखमी निषादने वडिलांच्या बाहुपाशातच प्राण सोडला. तब्बल चार तास त्याला उपचार मिळावे म्हणून त्याच्या वडिलांची धडपड सुरू होती, पण असंवेदनशील व्यवस्थेमुळे अखेर निषादला जीव गमवावा लागला.

‘पप्पा, मी बाहुबली आहे..’

अपघातात जखमी झालेल्या निषादला घेऊन त्याचे वडील रुग्णालयात फेऱ्या मारत होते. त्यावेळी त्यांचा चेहरा चिंताग्रस्त झाला होता. मात्र ‘पप्पा, मी बाहुबली आहे. मला काही होणार नाही..’ अशा शब्दांत निषाद आपल्या चिंतातुर वडिलांना धीर देत होता. हे सांगताना त्याचे वडील गोविंद घाडी यांच्या डोळय़ात पाणी तरळले. ‘मी कुणाला दोष देऊ. माझे आयुष्यच उद्म्ध्वस्त झाले आहे. माझा ११ वर्षांचा मुलगा गेला आहे..’ अशा शब्दांत गोविंद घाडी यांनी शोक व्यक्त केला.

‘रुग्णालयांवर कारवाई करावी’

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. चार खासगी  रुग्णालयांनी निषादला दाखल करून घेण्यास नकार दिला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून रुग्णालये दोषी आढळली तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक सुदेश चौधरी यांनी व्यक्त केली. या प्रश्नी त्यांनी बैठकीत लक्षवेधी उपस्थित केली. पालिका आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. जर ही रुग्णालये दोषी आढळली तर त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो.