घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंतीे वसई-विरारमध्ये जल्लोषात साजरी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंत गुरुवारी वसई-विरार शहरामध्ये मोठय़ा जल्लोषात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत डॉ. आंबेडकर यांच्या जयजयकाराने शहर दुमदुमून गेले.
‘एक गाव एक जयंती’चा प्रयोग वसईत बऱ्यापैकी यशस्वीे राबविण्यात आला. सर्व संघटना आणि पक्षांनी एकत्र येऊन ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंतीे महोत्सव समिती’ स्थापन केली होती. वसई-विरार महापालिकेच्या सहकार्याने एकत्रित हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस हा उत्सव साजरा झाला. गुरुवारी सकाळी समितीच्या वतीने नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल चौकापासून शुर्पारक मैदानात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. अग्रलाल चौकात पंचरंगीे ध्वज फडकवून मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत हजारो आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. दुपारच्या रणरणत्या उन्हाची पर्वा न करता लोक सहभागीे झाले होते.
मार्टीन कॉम्प्लेक्स, आचोळे रोड, रेल्वे पूल, सोपारा रोड मार्गे ही मिरवणूक शूर्पारक मैदानात सांगता झाली. तेथे तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मिरवणुकीत सांस्कृतिक नृत्य, डॉ बाबासाहेब आंबेडकरांवरील आकर्षक चित्ररथ लक्ष वेधून घेत होते. अनेक भिक्कू या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीला विविध भागातून लोक सहभागी होत होते. गुरुवारी संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध होती, तिला कुठेही गालबोट लागले नसल्याने पोलिसांनी सांगितले. महोत्सव समितीेचे अध्यक्ष रूपेश जाधव, उपाध्यक्ष अजित खांबे, सचिव नरेश जाधव आदींनी या मिरवणुकीचे आयोजन केले होते.

फटाक्यांची आतषबाजी आणि निळे झेंडे
बुधवारी मध्यरात्री बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वसईत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रथमच अशा प्रकारचीे आतषबाजी करण्यात आली होती. वसईच्या रस्त्यांवर जागोजागी निळे झेंडे लावण्यात आले होते. आंबेडकरी अनुयायांनी सकाळी स्थानिक बुद्धविहारात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. तरुणांनी शहरात निळे झेंडे फडकवत दुचाकी रॅली काढली होती. पालिकेने या महोत्सवासाठी ३५ लाखांचे अनुदान दिले आहे. बुधवारी शूर्पारक मैदानात झालेल्या कार्यक्रमात महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या जीवनावरील तैलचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी बाबासाहेबांच्या विचारांवरील काव्यसंमेलन संपन्न झाले. त्यात ५१ कवींनी सहभाग घेतला. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला पालिकेचे सर्व प्रभाग समिती सभापती, अधिकारी आणि नगरसवेक उपस्थित होते.