वाहनांचे छायाचित्र काढून ई-चलानाद्वारे दंड; हुज्जत टाळण्यासाठी पोलिसांची नवी शक्कल

ठाणे शहरात विशेषत नौपाडा, पाचपाखाडी, चरई यांसारख्या भागांत रस्त्याच्या कडेला मन मानेल त्या पद्धतीने वाहने उभे करत वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून ही कारवाई करत असताना होणारे वाद टाळण्यासाठी अशा वाहनांचे छायाचित्र काढून त्यांना ई-चलानद्वारे दंड आकारला जात आहे.

नौपाडा तसेच आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर कोणत्या वेळेत कोठे वाहने उभी करावीत याविषयी ठरावीक नियमावली आहे. मात्र, अनेकदा या नियमांची वाहनचालकांना माहिती नसते. तसेच या भागात पार्किंग धोरण आखण्याची तयारीही अनेक वर्षांपासून महापालिका करीत आहे. ही नियमावली आणि त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागांची अंमलबजावणीही कागदावर आहे. तरीही वाहतूक पोलिसांनी आखून दिल्यानुसार सम-विषम पद्धतीची पार्किंग व्यवस्था आणि वेळा पाळणे वाहनचालकांना बंधनकारक आहे. असे असताना अनेक वाहनचालक या नियमांचे पालन करत नाहीत, असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

नौपाडा, गोखले रोड, ठाणे स्थानक परिसरात चारचाकी वाहनचालकांकडून बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. या वाहनांवर कारवाई करताना अनेकदा वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये वाद होत असतात. या वादामुळे पोलिसांवर हल्ल्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे या परिसरात ई-चलान यंत्रणेची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे. ई-चलान यंत्रणेद्वारे आकारण्यात येणारा दंड हा थेट वाहनचालकांच्या मोबाइल क्रमांकावर संदेशाद्वारे पाठवला जात आहेत. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या चालकाला दंड भरण्याव्यतिरिक्त पर्याय उरत नसल्याने वाहतूक पोलीसही समाधान व्यक्त करीत आहेत.

वाहने उभी कुठे करावीत?

नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी मैदान परिसर, तलावपाळी या भागात अनेक जण दुचाकी आणि कार घेऊन येतात. त्यामुळे ठाणे महापालिका आणि वाहतूक शाखेने येथील रस्त्यांकडेला सकाळी आणि दुपारच्या वेळेत नियम आखून दिले आहेत. गोखले रोड येथे सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्थानकापासून नौपाडय़ात येणाऱ्या मार्गाच्या डाव्या दिशेला, तर दुपारी ३ ते रात्री १२ पर्यंत त्याच्याविरुद्ध दिशेकडील रस्त्याकडेला वाहने उभी करण्यास परवानगी आहे. तर राम मारुती रोड, गावदेवी मैदान परिसर, विष्णुनगर, तलावपाळी परिसरातही अशाच प्रकारे नियम आहेत. ज्या ठिकाणी अधिकृत पार्किंग आहे. त्या ठिकाणी पिवळा पट्टा रंगविलेला असतो. या पिवळ्या पट्टय़ाच्या आत आणखी एक उभी पांढरी पट्टी असते. त्या पांढऱ्या पट्टीच्या आत वाहन उभे करावे लागते. एखाद्या वेळी तुम्ही वाहन पिवळ्या पट्टय़ाच्या आत उभे केले. मात्र वाहन पांढऱ्या पट्टीबाहेर गेले तरीही तुम्हाला दंड आकारण्यात येतो. हा नियम लागू असला तरी पिवळ्या आणि पांढऱ्या पट्टय़ा असलेल्या जागा नेमक्या कोणत्या आणि कोठे आहेत, याविषयी वाहनचालकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे अशी कारवाई करताना नियमांविषयी अधिक जागरूकता करण्याची आवश्यकताही व्यक्त केली जात आहे.

जॅमर, टोइंगचे प्रमाण आटोक्यात

रस्त्याच्या कडेला चुकीच्या पद्धतीने उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर यापूर्वी ठाणे वाहतूक शाखेकडून गाडीच्या चाकाला जॅमर बसवून कारवाई केली जात होती. कार किंवा चारचाकी वाहनांना टोइंगद्वारे उचलणे शक्य नसल्याने अनेक तास हे वाहन नो पार्किंगमध्ये उभे राहते. वाहनचालक त्या ठिकाणी आल्यानंतर वाहतूक पोलीस कर्मचारी त्या वाहनचालकाला दंड आकारण्यासाठी येतात. मात्र वाहनचालकांकडून पोलिसांसोबत वाद घातले जातात. ठाण्यात १४ फेब्रुवारीला ई-चलान यंत्रणा सुरू झाल्यापासून नो पार्किंगमध्ये कार आणि चारचाकी वाहने उभी करणाऱ्यांच्या वाहनांचे छायाचित्र काढून वाहन चालकाविरोधात थेट ई-चलान कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. अशा प्रकारे कारवाई झाल्यानंतर तो पुन्हा बेकायदा वाहन उभे करण्याचे धाडस करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच वाद होत नसल्याने पोलिसांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. दररोज चुकीच्या पद्धतीने उभ्या करण्यात येणाऱ्या १५ ते २० कारचालकांविरोधात नौपाडा शाखेकडून ई-चलानद्वारे दंड आकारला जातो. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही सुधारण्यास मदत होत असल्याचे नौपाडा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे यांनी सांगितले.

ई-चलान सुरू झाल्यापासून कारवायांना वेग आलेला आहे. कारवाई आणि दंडाची माहिती थेट मोबाइल संदेशाद्वारे जात असल्याने पोलीस आणि वाहनचालकांमध्ये वाद निर्माण होत नाही. वाहनचालकांना दंडाची रक्कम भरावीच लागते. शहरात नो पार्किंगमध्ये उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई होत असल्याने नौपाडा, गोखले रोड परिसरातील वाहतूक कोंडीदेखील कमी होण्यास मदत झाली आहे.

– अविनाश पालवे, साहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे वाहतूक विभाग.