वसई-विरार पालिका आयुक्तांचा कृती आराखडा; अनधिकृत इमारती तोडण्यास सुरुवात
वसई-विरार शहरांतील अनधिकृत बांधकामे दिवाळीनंतर तोडण्यात येतील, अशी घोषणा करणारे महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिवाळीनंतर लागलीच त्यावर अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे हटवण्याकरिता आयुक्तांनी विशेष कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार बांधकामे पाडण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली.
परवडणाऱ्या घरांच्या शोधात असलेल्या सर्वसामान्यांचा ओढा वसई-विरार शहरांकडे वाढू लागल्याने या शहरांत मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. या बांधकामांमुळे पालिकेचे अनेक सार्वजनिक वापराचे भूखंड बळकावण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर आयुक्त सतीश लोखंडे यांनी शहरातील बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारपासून विविध प्रभागांतील बेकायदा इमारती पाडण्यास सुरुवात करण्यात आली. वसई फाटय़ाजवळील प्रभाग डी आणि फ मधील सव्‍‌र्हे क्रमांक ९६ मधील खान कम्पाऊंड येथे जेसीबीच्या साहाय्याने ३ खोल्या, २ गाळे तोडण्यात आले. मंगळवारी सकाळी पुन्हा मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. विरारच्या फुलपाडा, फ प्रभागातील सव्‍‌र्हे क्रमांक १२०, बिलालपाडा डोंगर पाडा, श्रीराम नगरर, क प्रभागातील सव्‍‌र्हे क्रमांक ८५, जानक्या धाम नगर, जुचंद्र सोमेश्वर नगर आदी ठिकाणांवरील बेकायदेशीर बांधकामे तोडण्यात आली. त्यात गाळे, दुकाने, निवासी इमारती यांचा समावेश होता. या वेळी आयुक्तांनी संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कारवाईने चाळ माफियांचे आणि बोगस बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत.

आयुक्तांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’
’अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी मंगळवारी पालिकेत एक बैठक घेऊन कृती आराखडा मांडला.
’या आराखडय़ानुसार, नगररचना विभागाच्या उपसंचालकांना सर्व अनधिकृत इमारतींची यादी सादर करावयाची आहे.
’शहर अभियंत्यांनी महावितरणला सांगून वीज जोडणी आणि नळ जोडणी तोडायची आहे.
’साहाय्यक प्रभाग आयुक्तांनी तात्काळ तोडण्याची कारवाई हाती घ्यायची आहे.
’कारवाई करताना आलेला खर्च संबंधितांकडून वसूल करायचा आहे.
’ज्या इमारतीत स्थगिती आदेश असेल तर स्थगिती आदेश उठविण्याचे काम विधि समितीमधील सदस्यांना दिले आहेत.
’इमारती तोडल्यानंतर मोकळ्या झालेल्या भूखंडावर तात्काळ संरक्षक भिंत आणि कुंपण घातले जाणार आहे.
’काय कारवाई केली त्याचा आठवडय़ाचा अहवाल खुद्द आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.

नागरिकांना आवाहन
वसई-विरार शहरात अनेक बोगस आणि तोतया बिल्डरांचा सुळसुळाट झालेला आहे. ते मुंबईतल्या मध्यमवर्गीय लोकांना बांधलेल्या बेकायदेशीर चाळी आणि घरे विकतात. पण त्यांना सादर केलेली कागदपत्रे बनावट असतात. सर्वसामान्य नागरिकांना त्याची माहिती नसते. एकदा ते राहायला आल्यावर त्यांची फसगत होते. त्यामुळे रहिवाशांनी घरे घेताना पालिकेत त्या संबंधित बिल्डरांविषयी आणि कागदपत्रांविषयी खात्री करावी, असे आवाहन लोखंडे यांनी केले आहे.

आम्ही शहरात एकही बेकायदेशीर इमारत उभी राहू देणार नाही. कारवाईदरम्यान आम्हाला सर्व यंत्रणांचे सहकार्य मिळत असून कुठलाही दबाव येत नाही. इमारतींवर कारवाई करताना संबंधित बिल्डरवर एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याचे कामही सुरू केले आहे.
– सतीश लोखंडे, वसई-विरार महापालिका आयुक्त