विरारमधील रहिवाशांचा रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास

पाच वर्षांत अपघातांत ७६ बळी

विरार शहरात पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल दोन वर्षांपूर्वी सुरू झाला असला तरी ठेकेदाराने त्यावर नागरिकांसाठी जिनाच बांधलेला नाही. म्हणजे उड्डाणपूल तयार असला तरी त्यावर जाण्यासाठी जिनाच नसल्याने या उड्डाणपुलाचा काहीच उपयोग होत नाही. शहरातील रहिवाशांना त्यामुळे रूळ ओलांडूनच प्रवास करावा लागतो. या धोकादायक प्रवासामुळे गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी ७६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

विरार शहरात पूर्व आणि पश्चिेला जोडणारा उड्डाणपूल मंजूर होऊन अनेक वर्षे जागा हस्तांतर आणि इतर अडथळ्यांमुळे रखडला होता. सर्व परवाने मिळाले आणि दोन वर्षांपूर्वी हा उड्डाणपूल बांधून पूर्ण झाला. यामुळे वाहनांची मोठी सोय झालेली आहे. परंतु या उड्डाणपुलावरून पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी रहिवाशांसाठी स्वंतत्र मार्गिका आणि जिना बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना उड्डाणपुलाच्या खालून (जुने फाटक) रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करावी लागते. या ठिकाणाहून रूळ ओलांडणे अतिशय धोकादायक ठरत आहे.

विरार येथील सामाजिक कार्यकर्ते संदेश घोलप यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते, महापालिका आणि रेल्वेकडे पत्रव्यवहार केला होता. माहिती अधिकारातील माहितीनुसार या उड्डाणपुलाच्या मूळ आराखडय़ात जिना आणि मार्गिका दाखविण्यात आली आहे. पंरतु ठेकेदाराने तो बांधलेलाच नाही. रेल्वेने या जिन्यासाठी जागेचीही तरतूद करून ठेवल्याचे घोलप यांनी सांगितले.

जिना नसल्याने रहिवाशांना रेल्वे रूळ ओलांडावे लागत आहे. ते त्यांच्या जिवावर बेतत आहे. माहिती अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार या ठिकाणी २००९ ते २०१३ या वर्षांत तब्बल ७६ जणांचा रूळ ओलांडताना मृत्यू झाला आहे. याबाबत मी उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा केला होता, तेव्हा ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याने त्याचे बिल थांबविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने सूचना दिल्या होत्या. परंतु ठेकेदाराला सर्व रक्कम अदा करण्यात आली असूनही जिना तयार झाला नाही.

 संदेश घोलप, सामाजिक कार्यकर्ते

जागा आहे, पण..

जिन्यासाठी जागा नसल्याचे पालिका सांगत आहे, परंतु पूर्वेकडे मोठी जागा रेल्वेने दिलेली आहे. पश्चिमेला रेल्वे व डोंगरपाडा येथे रस्त्याला लागून असलेल्या गटारावर स्लॅब टाकून जिना उतरवला जाऊ शकतो, असे घोलप यांनी पालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. एककीडे रेल्वे रूळ ओलांडू नका, असे आवाहन केले जाते. परंतु त्यासाठी कसलीही पर्यायी तरतूद केली जात नसल्याने लोकांना असा धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडावे लागत आहे.