‘मास्टिक’ पद्धतीने रस्त्यांची डागडुजी; दोन-तीन महिन्यांत कामांची पूर्तता

ठाणे : ठाणे शहरातून जाणारे महामार्ग आणि त्यावरील उड्डाणपुलांच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून येथून प्रवास नकोसा झाला आहे. यावरून टीकेचे धनी बनलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाने अखेर या पुलांच्या डागडुजीकडे लक्ष दिले आहे. नितीन कंपनी ते घोडबंदर मार्गावरील वाघबीळपर्यंतच्या उड्डाणपुलांवरील रस्त्यांची ‘मास्टिक’ पद्धतीने दुरुस्ती करण्यात येत असून दोन-तीन महिन्यांत सर्व पूल खड्डेमुक्त होणार आहेत.

ठाणे जिल्ह््याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या खात्यांतर्गत राज्य रस्ते विकास महामंडळ येते. असे असताना ठाणे शहरातील उड्डाणपुलांची दुरवस्था झाल्याने विरोधकांनी शिंदे यांना लक्ष्य केले होते. मध्यंतरी शिंदे यांनी महापालिका, रस्ते विकास मंडळ तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत ठाणे शहरातून जाणाऱ्या रस्त्यांच्या व पुलांची दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. अखेर राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या अखत्यारीतील नितीन कंपनी ते वाघबीळपर्यंतच्या पुलांवरील रस्त्यांची मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. या पद्धतीने रस्ते दुरुस्ती केल्याने पुढील चार-पाच वर्षे या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असा दावा या विभागाकडून करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद हे महत्त्वाचे महामार्ग जातात. हे महामार्ग आणि त्यावरील उड्डाणपूल विविध विभागांच्या अखत्यारित येतात. मुंबई-नाशिक महामार्गावरील नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवाडा तर, घोडबंदर भागांतून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कापुरबावडी, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ चौकातील उड्डाणपूल राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येतात. पाऊस थांबल्यानंतर या उड्डाणपुलांच्या नूतनीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केले आहे. त्यासाठी वाघबीळ आणि पातलीपाडा उड्डाणपुलावरील डांबराचा थर पूर्णपणे काढण्याचे काम सुरू असून काही ठिकाणी हा थर पूर्णपणे काढण्यात आला आहे. या रस्त्यांचे मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने दुरुस्ती करण्यात येत आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा वेळेत ही कामे केली जात आहेत.