ठाणे महापालिकेचा दोन संस्थांशी करार

ठाणे शहरातील कचऱ्यातून इंधन निर्मिती करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा पहिला भाग म्हणून हा प्रकल्प उभारण्यात मदत करणाऱ्या दोन संस्थांशी महापालिका प्रशासनाने मंगळवारी करारनामे पूर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात शहरातील पहिलावहिला जैव सीएनजी निर्मिती प्रकल्प उभारण्याबरोबरच हरित कचऱ्यापासून जळाऊ इंधनाचा प्रकल्पही उभा केला जाणार आहे.

निसर्गऋण तंत्रज्ञानाचा वापर करून हॉटेल तसेच भाजीपाला बाजारातून जमा होणाऱ्या कचऱ्यापासून सीएनजी इंधन, तर हरित कचऱ्यापासून जळाऊ इंधन तयार करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपूर्वी यासंबंधीच्या प्रकल्पाचे सुतोवाच केले होते. त्यानुसार जैव सीएनजी निर्मितीसाठी पालिकेने ‘प्रेरणा बहुउद्देशीय संस्थे’शी करार केला आहे. सद्य:स्थितीत कळवा येथे १५ मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प दुरुस्त करून कार्यान्वित करणे तसेच त्याची क्षमता अतिरिक्त १० मेट्रिक टनाने वाढवून एकूण २५ मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करणे, या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. एकूण सहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित मानला जात आहे. हा खर्च संबंधित संस्था उभा करणार आहे. प्रकल्प २० वर्षांच्या मुदतीसाठी चालविण्यास देणार असून, यातून मिळणारा गॅस, इंधन हे महापालिकेस शासकीय दरापेक्षा १२ टक्के सवलतीत उपलब्ध होऊ  शकणार आहे.

हरित कचऱ्यापासून जळाऊ  इंधन प्रकल्पाच्या करारनाम्यावरही मंगळवारी स्वाक्षरी करण्यात आली. समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेस १० वर्षांच्या कराराने चालविण्यास देण्यात आला आहे. अंदाजे १० टन क्षमतेचा हा प्रकल्प असून कोपरी पूर्व येथील मल:निसारण प्रक्रिया केंद्र येथेच कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर एक वर्षांने ही संस्था प्रतिदिनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी एक टन इतके जळाऊ  इंधन नि:शुल्क देणार आहे.