|| भाग्यश्री प्रधान

ब्रिटिशकाळातील तोफांचा बोटी बांधण्यासाठी वापर

ब्रिटिशकाळात निकामी झालेल्या तोफा वाळूत रुतवून त्यांचा वापर बोटी बांधण्यासाठी केला जात असे. अशाच काही तोफा ठाणे पूर्व विभागातील मीठबंदर परिसरात असून काही वर्षांपूर्वीपर्यंत चेंदणी कोळीवाडय़ातील कोळी या तोफांचा बोटी बांधण्यासाठी वापर करीत असत. मात्र, ऐतिहासिक वारसा असलेल्या या तोफांचे जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मेरिटाइम बोर्ड, पुरातत्त्व खाते आणि ठाणे महापालिकेने यासाठी परवानगी दिली आहे.

पूर्वीच्या ठाणे किल्ल्याच्या अर्थात सध्याच्या ठाणे कारागृहाच्या परिसरात काही निकामी तोफा होत्या. या तोफा ब्रिटिशांनी मीठबंदरावर येणाऱ्या बोटी बांधण्यासाठी मातीत रुतवून ठेवल्या होत्या. त्या वेळी चेंदणी बंदरावरील बोटी बांधण्यासाठी या तोफांचा वापर केला जात असे. कालांतराने येथील जल वाहतूक थांबली. त्यानंतर चेंदणी कोळीवाडा परिसरातील कोळय़ांनी आपल्या बोटी बांधण्यासाठी या तोफांचा वापर केला. मात्र, सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी खाडीतील माशांची आवक कमी झाल्यानंतर या परिसरातील मासेमारीचा व्यवसायही बंद पडला. तोफा मात्र जमिनीत रुतून ऊन-पाऊस झेलत उभ्या आहेत.

या तोफांचे जतन व्हावे यासाठी चेंदणी कोळीवाडा जमात, दुर्गवीर प्रतिष्ठान, दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट आणि रत्नागिरी गडकोट संवर्धन समिती या संस्था गेले वर्षभर प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या जागेचा ताबा असलेल्या महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी तोफा काढण्यासाठी परवानगी दिली आहे. पुरातत्त्व विभागानेही याची दखल घेत मातीत खोलवर रुतलेल्या तोफा काढण्यासाठी उत्खनन करावे, अशी परवानगी देत पुरातत्त्व शास्त्राचे अभ्यासक डॉ.सचिन जोशी यांच्याकडे हे कार्य सोपवले आहे.

येत्या २० मे रोजी तोफा उत्खननासाठी काम सुरू करण्यात येणार आहे. साधारणत: तोफा किती आतपर्यंत रुतल्या आहेत याची मोजणी सर्वप्रथम करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.सचिन जोशी यांनी दिली. या तोफांचे जतन करण्यासाठी परिसरातच एक सिमेंटचा ओटा तयार करण्यात येणार आहे.

या ठिकाणी एकूण ११ तोफा असून त्या आता गंजल्या आहेत. त्यांची आणखी हानी होऊ नये म्हणून तातडीने त्या काढाव्या लागतील. या तोफा अंदाजे शंभर वर्षे जुन्या आहेत. मात्र त्या कोणत्या राजवटीच्या काळातील आहेत हे त्या तोफा काढल्यानंतर त्यावर लिहिलेल्या मजकूर किंवा चिन्हावरून समजू शकते.   – सचिन जोशी, पुरातत्त्व विभागाचे प्राध्यापक, डेक्कन महाविद्यालय (पुणे)