डोंबिवलीच्या पेंढरकर महाविद्यालय रस्त्याजवळील प्रकार

लोकसत्ता प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयासमोरील रस्त्यावरील चौकात रस्त्याखालून गेलेली एक वाहिनी तुटली आहे. या तुटलेल्या वाहिनीचा एक भाग सतत वाहनांच्या टायर खाली येत आहे. एखादा दुचाकी स्वार या वाहिन्याच्या तुटलेल्या भागात अडकून अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रात्रीच्या वेळेत हा तुटलेला तुकडा लक्षात येत नाही, अशा तक्रारी वाहनचालकांनी केल्या आहेत.

पेंढरकर महाविद्यालया समोर शिळफाटा रस्ता, सावित्रीबाई फुले चौक आणि घरडा सर्कलकडे येण्यासाठी एक चौक आहे. या चौकात ही वाहिनी टाकण्यात आली आहे. या वाहिनीचा एक तुकडा सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे तुटून रस्त्यावर आला आहे. या ठिकाणी एक खड्डा आहे. त्यामुळे वाहनचालकाला तुटलेला तुकडा पटकन लक्षात येत नाही. दुचाकी स्वार चुकून या तुटलेल्या वाहिनीवरून गेला की तो तुकडा मागील चाकात अडकण्याची शक्यता आहे, असे दुचाकी स्वारांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा विषय येत असल्याने पालिका किंवा एमआयडीसी अधिकारी या गंभीर विषयाकडे लक्ष देत नाही.

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तुटलेला वाहिनीचा तुकडा रस्त्यामधून काढून टाकण्याची मागणी होत आहे.