X

रिक्षासाठीच्या शर्यतीत फुटक्या फरशांचे अडथळे

या वाहनतळाच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या अनेक फरशा उखडल्या गेल्या आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या रिक्षा वाहनतळाची अक्षरश: दुर्दशा झाली असून तुटलेल्या फरशांमुळे या ठिकाणी पाय अडकून प्रवाशांना इजा होण्याच्या घटना वाढत आहेत. रिक्षा वाहनतळातील तुटलेल्या फरशांमुळे अपघात होत असल्याच्या तक्रारी ज्येष्ठ नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेकडे वारंवार केल्या असल्या तरी रिक्षा वाहनतळाच्या दुरुस्तीकडे महापालिका सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस या तुटलेल्या फरशांवरून प्रवासी पडून जखमी होत असल्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने एखादा मोठा अपघात झाल्यावरच महापालिका हे रिक्षा वाहनतळ दुरुस्त करणार का असा सवाल ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक आणि दोन येथून बाहेर पडल्यानंतर बाहेरच रिक्षा वाहनतळ तयार करण्यात आले आहे. स्थानकापासून शहराच्या विविध भागाकडे जाण्यासाठी येथून रिक्षा मिळत असल्याने या वाहनतळावर प्रवाशांची २४ तास गर्दी असते. या वाहनतळाच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या अनेक फरशा उखडल्या गेल्या आहे. याठिकाणी डागडुजी न झाल्याने फरशांच्या अस्ताव्यस्त उखडलेल्या फरशांमध्ये पाय अडकून प्रवाशी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. विशेषत: सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी रिक्षा पकडण्याच्या धावपळीत असे प्रकार हमखात घडतात. मात्र, पालिकेचे अद्याप याकडे लक्ष गेले नाही.

विजेच्या खांबाचाही धोका

रिक्षा वाहनतळामध्ये प्रवाशांची रांग जाण्याच्या मार्गावर मध्यभागी एक विजेचा खांब बांधण्यात आला आहे. या खांबातून येणाऱ्या विजेच्या तारा उघडय़ावरच लोंबकळत असतात. या उघडय़ा तारांना प्रवाशांचा चुकून हात लागल्यास विजेचा धक्का लागण्याचे धोका देखील नाकारता येत नाही.

संबंधित अधिकाऱ्याशी त्वरित संपर्क साधून रिक्षा वाहनतळाची पाहणी केली जाईल. त्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात येतील.

संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain