ब्रसेल्स बॉम्बस्फोटातील बळी; कुटुंबीय बेल्जियमला रवाना

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात राघवेंद्र गणेशन या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. राघवेंद्र हे मूळचे भाईंदर पूर्व येथील निर्मल पार्क परिसरातील. त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर त्यांच्या मित्रपरिवाला जबरदस्त धक्का बसला असून निर्मल पार्क परिसर शोकसागरात बुडाला आहे.

ब्रसेल्समध्ये कामानिमत्त गेलेल्या राघवेंद्र यांचा बॉम्बस्फोटानंतर पत्ता लागत नव्हता. त्यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न त्यांच्या कुटुंबीयांकडून केला जायचा. याच संकुलात राहणारे त्यांचे मित्रही काळजीत होते. त्यांच्या शोधासाठी कुटुंबीय बेल्जियमाला रवाना झाले. मात्र सोमवारी रात्री राघवेंद्रचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आणि निर्मल पार्क परिसरावर शोककळा पसरली.

एस. व्ही. रोड परिसरातल्या निर्मल पार्कमध्येच राघवेंद्र लहानाचे मोठे झाले. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या राघवेंद्र यांचा स्वभावही मनमिळावू असल्याने त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांचे शिक्षण भाईंदरच्या सेंट फ्रान्सिस शाळेत झाले. अभ्यासाप्रमाणे राघवेंद्र खेळातही प्रवीण होते. क्रिकेटमध्ये त्याला विशेष रुची. सुटीच्या दिवशी मित्र मंडळी जमवून दोन इमारतींच्या मध्ये क्रिकेटचा खेळ अगदी रंगात यायचा, असे त्यांचा मित्र दीक्षित खत्री सांगतो. पंधरा-वीस जणांचा त्यांचा ग्रुप खूप धमाल करायचा. शालेय शिक्षणानंतर राघवेंद्र अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेला आणि नंतर नोकरीनिमित्त बंगळुरूला गेला. मात्र तरीही मित्रांना तो विसरला नव्हता. भाईंदरला आला की आवर्जून सर्वाना भेटायचा. अवघ्या काही दिवसांपूर्वीच तो भाईंदरला आई-वडिलांना भेटायला आला होता. दहा दिवस त्याने मुक्काम केला होता. त्याआधी पत्नीला भेटण्यास तो चेन्नईला जाऊन आला होता. पुत्ररत्न झाल्याबद्दल सर्व मित्रांनी त्याचे खास अभिनंदन केले होते. ब्रसेल्समधले त्याचे काम चार महिन्यांनी संपणार होते आणि त्यानंतर भाईंदरला येऊन खूप धमाल करायची असे त्याने मित्रांना सांगितले होते; परंतु तो दिवस आलाच नाही, असे सांगताना प्रीतेश पंडय़ा यांचा कंठ दाटून आला.

बॉम्बस्फोटानंतर राघवेंद्रचा पत्ता लागत नसल्याचे त्याच्या मित्रांना समजले. राघवेंद्रचा पत्ता लवकर लागावा, अशी देवाकडे प्रार्थना करत त्याच्या मित्रांचे डोळे सतत वृत्तवाहिन्यांकडे लागले होते. मात्र सोमवारी रात्री त्याच्या मृत्यूबाबतची माहिती मिळताच त्याच्या मित्रांना प्रचंड धक्का बसला. घरातलीच व्यक्ती गेल्यासारखे संपूर्ण निर्मल पार्क परिसरात शोकाकुल वातावरण  आहे.

विचित्र योगायोग

राघवेंद्र राहत असलेल्या संकुलाला अगदी लागून राजा रामदेव पार्क संकुल आहे. १३ जुलै २०११ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्या वेळी ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या स्फोटात राजा रामदेव पार्क संकुलात राहणारे बाबुराम दास मृत्युमुखी पडले होते. आता पाच वर्षांनंतर रामदेव पार्क शेजारील निर्मल पार्क संकुलात राहणाऱ्या राघवेंद्र गणेशनचाही बॉम्बस्फोटातच मृत्यू व्हावा हा विचित्र योगायोग आहे.