कल्याण दूरसंचार विभागाने कल्याण शहर परिसरातील ५१ ठिकाणी ‘वाय फाय’ सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही ५१ ठिकाणे ‘हॉट स्पॉट’ म्हणून निवडण्यात आली आहेत. या ठिकाणी नागरिकांना उच्चतम दर्जाची, गतिमान इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘बीएसएनएल’च्या मुंबई कार्यालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तातडीने हे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘भारत संचार निगमचे’ कल्याण विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एल. एस. रोपिया यांनी दिली. बीएसएलने ‘वाय फाय’साठी ही ठिकाणे निश्चित केली असली तरी कालांतराने त्यांचा आढावा घेऊन ‘वाय फाय’साठीचे दर निश्चित करण्यात येणार आहे.

फायबर टू द होम
उल्हासनगर, वसई, पालघर, कल्याण, तारापूर, डोंबिवली विभागात ‘फायबर टू द होम’ ही सेवा देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत ७४ जोडण्या ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. या सेवेच्या माध्यमातून ब्रॉड बॅण्ड सेवा २५६ किलोबाइट्स प्रतिसेकंद वरून १०० मेगाबाइट्स प्रतिसेकंद वाढविण्यात येणार आहे. या सेवेतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, व्हिडीओ कॉल, व्हाइस टेलिफोनी, थ्री डी टी. व्ही.सारख्या उच्चतम सेवांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

येथे वाय फाय उपलब्ध
काळा तलाव, कल्याण रेल्वे स्थानक, बिर्ला महाविद्यालय, मेट्रो जंक्शन मॉल, सर्वोदय मॉल, यशोधरा संकुल, वसंत व्हॅली, कल्याण-डोंबिवली पालिका परिसर अशी सुमारे ५१ ठिकाणे वाय फाय सेवेसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

प्रत्येक नागरिक तंत्रज्ञानसज्ज झाला आहे. मोबाइल, इंटरनेट ही प्रत्येकाची गरज आहे. अनेक सार्वजनिक सेवा या इंटरनेटच्या माध्यमातून मिळत आहेत, त्यामुळे ‘बीएसएनएल’च्या कल्याण विभागाने कल्याण परिसरातील ५१ ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणचे सर्वेक्षण करून ‘वाय फाय’ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एल. एस. रोपिया, वरिष्ठ महाव्यवस्थापक

* ‘बीएसएनएल’ने एक पोर्टल तयार केले आहे. या माध्यमातून घरी बसून नागरिक दूरध्वनी जोडणी, इंटरनेट सुविधेसाठी अर्ज करू शकतात.
* अंबरनाथमधील ऑर्डनन्स कंपनी, बदलापूर येथील मोहन पाम्स येथे नवीन दूरध्वनी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
* ग्रामपंचायत हद्दीत ब्रॉड बॅण्ड सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.