News Flash

ऐतिहासिक वारसा धोक्यात! नालासोपाऱ्यातील अडीच हजार वर्षे जुन्या बौद्धस्तुपाची दुरवस्था

नालासोपाऱ्यातील बौद्ध स्तुपाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बौद्ध स्तूप म्हणून गणना होते.

भगवान गौतम बुद्ध यांच्या वास्तव्याने पावन झालेले नालासोपारा येथील अडीच हजार वर्षे जुने बौद्ध स्तूप

 पुरातत्त्व खात्याकडे लाखो रुपयांचा निधी खर्चाविना पडून
भगवान गौतम बुद्ध यांच्या वास्तव्याने पावन झालेले नालासोपारा येथील अडीच हजार वर्षे जुने बौद्ध स्तूप कोसळण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक वारसा म्हणून नोंदवण्यात आलेल्या या बौद्ध स्तुपाच्या डागडुजीसाठी मिळालेला लाखो रुपयांचा निधी मिळून पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसाच पडून आहे. एरवी बौद्धजनांच्या मतांचे राजकारण करण्यासाठी वेगवेगळय़ा क्लृप्त्या आखणारे राजकीय नेतेमंडळींनीदेखील या स्तुपाच्या दुरवस्थेकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
नालासोपाऱ्यातील बौद्ध स्तुपाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बौद्ध स्तूप म्हणून गणना होते. भगवान बुद्धांनी या स्तुपात वास्तव्य केले होते. त्यामुळे बौद्ध धर्मीयांसाठीच नव्हे, तर ऐतिहासिक वारसा म्हणूनही या ठिकाणाला महत्त्व आहे. त्यामुळे देशभरातून पर्यटक/भाविक येथे येत असतात. मात्र पुरातत्त्व विभागाचा थंड कारभार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस या बौद्ध स्तुपाची दुरवस्था होत चालली आहे. याठिकाणी पर्यटकांच्या बसण्यासाठीची सुविधा नाही. प्रसाधनगृहही उभारण्यात आलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासूत स्तुपाच्या आवारात एक घर उभारण्यात आले आहे. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. हा परिसर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगत पालिकेने आपले हात वर केले आहेत. तर पुरातत्त्व विभागाकडून स्तुपाभोवती संरक्षक भिंत उभारण्याचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरूच आहे.
बौद्ध स्तूप आणि त्याभोवतालचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, यासाठी पर्यटन विकास महामंडळाने १५ कोटी रुपये, तर स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एक कोटी रुपयांचा निधी पुरातत्त्व विभागाकडे दिला होता. मात्र या निधीचा पुरेसा वापरच झालेला नाही. ‘या निधीचा वापर करून स्तुपाचे संवर्धन व्हावे यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो, परंतु काहीच प्रतिसाद मिळत नाही,’ असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष नरेश जाधव यांनी केला आहे. ‘या बौद्ध स्तुपाचा ‘अ’ वर्गातील तीर्थक्षेत्रांच्या यादीत समावेश करावा,’ अशी मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर वर्तक यांनी केली आहे.

अडीच हजार वर्ष जुना स्तूप
नालासोपारा हा परिसर प्राचीन काळान शुर्पारक नगरी नावाने ओळखला जात होता. येथील पूर्णा नावाचा व्यापारी उत्तर प्रदेशात गेल्यावर भगवान गौतम बुद्धांच्या प्रवचनाने प्रभावित झाला आणि त्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. शुर्पारक नगरीत परतल्यावर त्याने एक चंदनाचा स्तूप बांधला होता. या स्तुपात भगवान बुद्ध ७० दिवस राहिले होते. हा स्तूप जमिनीत गाडला गेला होता. १८८२ साली उत्खननात हा स्तूप सापडला होता. हा स्तूप २ हजार ५५९ र्वष जुना आहे. सम्राट अशोकाने धम्मप्रसार सुरू केल्यानंतर त्याने आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना भिक्कू आणि भिक्कूणी बनवून पाठवले होते. त्यांनीही या स्तुपाला भेट देऊन बौद्ध धम्माच्या प्रसारास सुरुवात केली होती. त्यांनी स्तुपात १४ शिलालेख कोरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 1:32 am

Web Title: buddhist stupa at nalasopara in danger
Next Stories
1 ‘डी मार्ट’च्या लिफ्टमध्ये बालकासह नऊ जण अडकले
2 बंद लॅपटॉप.. मोबाइल कचरापेटीत टाका!
3 दिवाळी पहाटचा उत्साह मावळला
Just Now!
X