कल्याण, डोंबिवली परिसरात मोक्याच्या ठिकाणी बेकायदा चाळी बांधणाऱ्या भूमाफियांनी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून इमारतींवरील कारवाई रोखण्यासाठी प्रार्थनास्थळांचे ‘संरक्षण कवच’ दिले आहे. कल्याण, डोंबिवलीत अशा प्रकारची सहा ते सात प्रार्थनास्थळांची बांधकामे सुरू आहेत. लोकप्रतिनिधी, माफिया आणि अनधिकृत बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही बांधकामे करण्यात येत असल्याने त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.  
पालिका हद्दीतील अनेक बेकायदा बांधकामांच्या कोपऱ्यावर अशी लहान, मोठी प्रार्थनास्थळे बांधण्यात आली आहेत. डोंबिवली एमआयडीसीत अशा प्रकारची प्रार्थनास्थळे बांधून भूमिपुत्रांनी आपली दुकाने सुरू केली असल्याचे दृश्य दिसते. कारवाईसाठी पालिका, एमआयडीसीचे पथक आले की माफिया रहिवाशांना पुढे करतात. बांधकामे पाडली तर प्रार्थनास्थळांची नासधूस होईल, असा देखावा माफिया, रहिवाशांकडून उभा केला जातो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको म्हणून पोलीस, पालिका अधिकारी त्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे सोडून देतात. हा पुर्वानुभव गाठीशी असलेल्या माफियांनी बेकायदा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या बांधकामांच्या कोपऱ्यावर प्रार्थनास्थळे बांधण्यास सुरुवात केली आहे. यावर पालिकेतील वरिष्ठ अधिकारी कारवाईसाठी काही करणार आहेत का, असा सवाल केला जात आहे.

कल्याण पूर्व भागात ‘ड’ प्रभाग बेकायदा बांधकामे आहेत. कल्याणजवळील बल्याणी येथे  प्रार्थना स्थळांचे बांधकाम सुरू आहे. डोंबिवली पश्चिमेत गरिबाचा वाडा भागातील पालिकेच्या चौपाटीच्या आरक्षित जागेवर बेकायदा चाळी बांधल्या आहेत. डोंबिवली पूर्वेतील मध्यवर्ती भागात असलेल्या एका मैदानाच्या कौपऱ्यावर एक प्रार्थना स्थळाचे काम सुरू  आहे.