देखभालीच्या नावाखाली पालिकेचा निर्णय; ३० दिवस खेळांशिवाय अन्य वापरासाठी बिल्डरला परवानगी

ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रा शहरातील विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी बिल्डरांवर ‘टीडीआर’ची उधळण करणाऱ्या महापालिका प्रशासनाने शहरातील मोकळी मैदानेही बिल्डरांच्या ताब्यात देण्यासाठी पाऊल उचलले आहे. घोडबंदर मार्गावरील भाईंदर पाडा परिसरातील ३५ हजार चौरस क्षेत्रफळाचे मैदान देखभाल आणि संवर्धनासाठी एका बडय़ा बिल्डरच्या ताब्यात देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हे मैदान वर्षांतील ३२० दिवस सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्याची अट घालतानाच वर्षांतील ४५ दिवस इतर कार्यक्रमांसाठी वापरण्याची मुभा बिल्डरला देण्यात आली आहे. या काळात व्यावसायिक व सामाजिक उपक्रम मोफत करण्याची परवानगी बिल्डरला देण्यात आली आहे, हे विशेष. पालिकेच्या या धोरणाबाबत प्रशासकीय वर्तुळातच कुरबुरी सुरू झाली असून सर्वसामान्य नागरिकांतूनही या धोरणाला विरोध होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात घोडबंदर मार्गावर भाईंदरपाडा भागात तब्बल ३५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे विस्तीर्ण मैदान महापालिकेच्या नावे झाले आहे. या मैदानातील २३९२ चौरस मीटर क्षेत्राकरिता एका बिल्डरने टीडीआरचा प्रस्ताव दाखल केला असून तो मंजूर करण्यासाठी महापालिकेत वेगाने पावले टाकली जात आहेत. असे असताना उर्वरित मैदानही याच बिल्डरला देखभाल, सुशोभीकरणासाठी तब्बल ३० वर्षांच्या करारनाम्यासाठी देण्याचा अजब प्रस्ताव आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तयार केला आहे.

या प्रस्तावानुसार सदर मैदान बिल्डरला ३० वर्षांकरिता देण्यात येणार आहे. यासाठी सदर भूखंडाच्या विद्यमान वर्षांतील रेडीरेकनर दराच्या एक टक्के इतकी रक्कम आकारली जाणार आहे. हे मैदान क्रीडा उपक्रमांसाठीच वापरण्याची अट पालिकेने घातली असून ते अन्य कुणाला भाडय़ाने देण्यासही मनाई केली आहे. परंतु, वर्षांतील ४५ दिवस हे मैदान अन्य कार्यक्रमांसाठी वापरण्याची परवानगीही संबंधित बिल्डरला देण्यात आली आहे. त्यातील १५ दिवस पालिकेसाठी हे मैदान राखीव असेल, तर उर्वरित ३० दिवस त्यावर बिल्डरचा हक्क असेल.

भाईंदर पाडा येथील एका मैदानासाठी आखण्यात आलेले हे धोरण शहरातील इतर मैदानांच्या बाबतीत अमलात आणण्याची शक्यता आहे. यासंबंधी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मंत्रालयात बैठकीसाठी व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांनी या धोरणासंबंधी बोलण्यास नकार दिला.

बिल्डरांसाठीच्या पायघडय़ा

ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या मोकळ्या जागांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्णत महापालिकेची आहे. शहरात मोठमोठे प्रकल्प उभे करताना गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनास आलेले बिल्डरप्रेमाचे भरते काही लपून राहिलेले राहीले. सेंट्रल पार्क, रस्ता रुंदीकरण, वेगवेगळ्या भागांतील सामाजिक सुविधांची उभारणी बिल्डरांच्या माध्यमातून करताना त्यांच्यावर कन्स्ट्रक्शन टीडीआरचा वर्षांव केला जात असल्याचे वेळोवेळी दिसून येते. काही बडय़ा बिल्डरांच्या नियोजित प्रकल्पांना लागून रस्ता रुंदीकरणाचा महापालिकेचा धडाका पाहून अनेकांच्या भुवया उंचावू लागल्या आहेत. असे असताना आता मैदानांच्या जागाही सुशोभीकरण आणि देशभालीच्या नावाखाली बिल्डरांना देण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.