घरविक्रीसाठी बांधकाम व्यावसायिकांची नवी शक्कल; मुंब्रा, कौसा परिसराचेही ‘नामकरण’

बांधकाम क्षेत्रात असलेली मंदी आणि नियोजनाच्या आघाडीवर फसल्यामुळे बदनाम झालेल्या दिवा परिसराच्या पट्टय़ातील गृहविक्री वाढावी, यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आता या परिसराचे नामकरण ‘नवी डोंबिवली’ असे केले आहे. दिव्यासह मुंब्रा, कौसा, दातिवली, नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली १४ गावे तसेच कल्याण-डोंबिवलीतील २७ गावे या उपनगरांतील बांधकाम प्रकल्पांच्या जाहिराती करताना ‘नवी डोंबिवली’ असा उल्लेख करण्यात येत आहे.

सध्या ठाण्याच्या पलीकडे भिवंडी परिसरात उभ्या रहात असलेल्या गृहप्रकल्पांची विक्री करण्यासाठी बिल्डरांनी या सगळ्या परिसराचा उल्लेख ‘नवे ठाणे’ असा करण्यास सुरुवात केली आहे. ‘ठाणे स्थानकापासून ३० मिनिटांच्या अंतरावर घर’ अशा स्वरूपाच्या जाहिराती विकासकांकडून केल्या जात असून प्रत्यक्षात हे प्रकल्प महापालिका हद्दीबाहेर मुंबई-नाशिक महामार्गावर असल्याचे आढळून येते. असाच काहीसा प्रकार आता दिवा, दातीवली पट्टय़ातील परिसराच्या बाबतीत बिल्डरांनी सुरू केला असून दिवा पूर्वेकडील भाग हा ‘नवी डोंबिवली’ या नावाने प्रसिद्ध करण्यात येत आहे. या भागातील घरांचे भाव हे अडीच ते साडे तीन हजार रुपये प्रति चौरस फूट इतके आहेत. तर मोठे बांधकाम प्रकल्प, टाऊनशिप प्रकल्पांमध्ये चार ते साडे पाच हजार रुपये प्रति फायनल-नाटेकर चौरस फूट दराने घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात  येत आहेत.  उपनगरीय रेल्वे मार्गावर दिवा-पनवेल या सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गाच्या बाजूने नवीन मार्ग तयार होत असून या मार्गावर निघू, निरवली, नांदिवली, नवी डोंबिवली, पिंपळास अशी रेल्वेस्थानके प्रस्तावित आहेत. ही रेल्वे स्थानके सुरू झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याशिवाय कल्याण- डोंबिवली- तळोजा हा मेट्रो मार्ग तयार झाल्यावर मेट्रोची सुविधाही या भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मिळणार आहे. हे लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिकांनी येथे गृहप्रकल्पांची आखणी सुरू केली असून या परिसराला ‘नवी डोंबिवली’ असे नाव देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सद्यस्थितीत या भागाला असलेली नियोजनाची अवकळा येथील घरांच्या विक्रीवर विपरीत परिणाम करू लागली आहे. मुंब्रा, शीळ पट्टय़ात सध्या मुंबईस्थित काही बडय़ा बिल्डरांचे गृहप्रकल्प उभे राहात असले तरी येथील पायाभूत सुविधेच्या दैनावस्थेमुळे या घरांना फारशी नोंदणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. हे लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिकांनी नव्या ठाण्याच्या धर्तीवर आता नवी डोंबिवलीची जोरदार जाहिरात सुरू केली आहे.

परिसराचे वाढते महत्त्व

  • गेल्या काही वर्षांत ठाण्याच्या पलीकडे भिवंडी आणि डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावे तसेच आसपासच्या परिसरात मोठय़ा संख्येने गृह प्रकल्पांची उभारणी होत आहे.
  • या प्रकल्पांना उभारी मिळावी यासाठी ठाणे महापालिकेने नजीकच्या काळात दिवा, दातिवली, डायघर परिसरात नवे रस्ते, उड्डाणपुलांची आखणी करण्यास सुरुवात केली आहे.
  • राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून याच पट्टय़ात हजारोंच्या संख्येने घरांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने २७ गावांलगत नवे विकास केंद्र उभारण्याचे पक्के केले असून कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी येथील रस्त्यांच्या रुंदीकरणाची योजना आखण्यात आली आहे.
  • या सगळ्या प्रयत्नांमुळे नजीकच्या काळात शीळ, दिवा, दातिवली, कल्याण-डोंबिवलीतील २७ गावे, १४ गाव या परिसरात बांधकाम क्षेत्राला उभारी येण्याची चिन्हे आहेत.

शहरी तसेच ग्रामीण भागात बांधकाम प्रकल्प मोठय़ा स्वरूपात सुरू आहेत. चलनकल्लोळानंतरही घरांच्या किमती स्थिर आहेत.  नवी डोंबिवली म्हणून अद्याप कोणत्याही भागाचे नामकरण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी जागेची व इतर सोयीसुविधांची माहिती घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा.

प्रफुल शहा, कल्याण डोंबिवली बिल्डर्स असोसिएशन अध्यक्ष