५० हजार घरांच्या विक्रीवर सावट; स्मार्ट सिटीच्या ब्रॅन्डिंगसाठी नव्याने व्यूहरचना

डोंबिवली औद्योगिक पट्टय़ात झालेला शक्तिशाली स्फोट, त्यापाठोपाठ कल्याणमधील कचराभूमीला लागलेली आग, ई. रवींद्रन यांच्यासारख्या खमक्या आयुक्तांनाही फेरीवाले आणि भूमाफियांकडून सातत्याने दाखविल्या जाणाऱ्या वाकुल्या यांसारख्या घटनांमुळे ही दोन्ही शहरे दिवसेंदिवस बदनामीच्या गर्तेत फसू लागल्याने येथील बांधकाम उद्योगापुढील चिंतेचे सावट अधिक गहिरे होऊ लागले आहे. कचराभूमीचा प्रश्न निकाली निघत नसल्याने उच्च न्यायालयाने या शहरांमधील नव्या बांधकामांवर घातलेली बंदी नुकतीच उठविल्याने बिल्डर आणि वास्तुविशारदकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. मात्र, डोंबिवलीचा स्फोट आणि कल्याणच्या आगीमुळे येत्या काळात उभारणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे ५० हजार घरांच्या विक्रीवर या घटनांचे सावट अगदी स्पष्टपणे जाणवू लागले असून निवडणूक काळात बोलबाला झालेल्या ‘स्मार्ट सिटी’चा डंका पुन्हा पिटला जावा यासाठी विकासकांच्या एका मोठय़ा गटाकडून व्यूहरचना आखली जात आहे.

बांधकाम क्षेत्रात मंदी अवतरल्याची ओरड जोमाने सुरू असली तरी ठाणे, नवी मुंबई यांसारख्या शहरांमध्ये घरांचे दर आजही गगनाला भिडल्याचे चित्र आहे. ठाण्याच्या घोडबंदर पट्टय़ात अगदी ओवळा वगैरेसारख्या टोकावरील भागातही ५५० ते ६६० चौरस फूट आकाराचे घर घ्यायचे असेल तरीही ५० ते ५२ लाखांची तयारी ठेवावीच लागते. त्यामुळे घरांच्या तुलनेने स्वस्त पर्यायासाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा उपनगरांच्या दिशेने धाव घेणाऱ्या ग्राहकांचा आकडा बराच मोठा आहे. वांगणी, शहापूर यांसारख्या ‘सेकंड होम’साठी ओळखल्या जाणाऱ्या भागांमध्ये उभारण्यात येणाऱ्या घरांनाही गेल्या काही वर्षांत मोठी मागणी येऊ लागली आहे. ठाण्यापासून दूर अंतरावर असलेल्या भिवंडी परिसरालाही आता नव्या ठाण्याची उपमा देऊन तेथेही घरबांधणी जोरात सुरू आहे. एकीकडे किफायतशीर घरांच्या खरेदीसाठी ग्राहकांकडून वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरू असताना कल्याण, डोंबिवली शहरांत गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांमुळे येथील बांधकाम व्यावसायिक मात्र चिंतेत आहेत.

कचराबंदीतून मुक्ती.. पण नियोजनाचा अडसर

कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या भागांतील कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणाच उपलब्ध नसल्याने मध्यंतरी उच्च न्यायालयाने येथील नव्या बांधकामांना स्थगिती दिली. तब्बल वर्षभरानंतर ही स्थगिती उठल्याने येत्या काळात या भागात ५० हजारांहून अधिक नव्या घरांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. टिटवाळा, आंबिवली, ठाकुर्ली या परिसरांत मोठय़ा प्रमाणावर नागरी संकुले, विशेष नागरी वसाहतींची उभारणी होत आहे. या ठिकाणी मोठय़ा संकुलांमधील ६५० ते ७०० चौरस फुटांच्या घराची विक्री सद्य:स्थितीत ४२ ते ४५ लाखाला होत आहे. स्फोट, आगीसारख्या घटनेमुळे हे दर खाली उतरण्याची शक्यता कमी असली तरी डोंबिवलीबाहेरील ग्राहकांच्या मानसिकतेवर मात्र नकारात्मक परिणाम होत असल्याची स्पष्ट कबुली कल्याण डोंबिवली बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल शहा यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली. कल्याण कचराभूमीवर दोन दिवसांपूर्वी लावलेली आग येथील ठरावीक बिल्डरांच्या बडय़ा प्रकल्पांना अडचणीत आणण्यासाठी लावली गेली असल्याचा संशय आहे, असेही शहा यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली ही शहरे नकारात्मक कारणांमुळे सातत्याने प्रकाशात आली. या ठिकाणी ई. रवींद्रन यांच्यासारखा धडाकेबाज अधिकारी महापालिका आयुक्त म्हणून नेमला आहे. त्यांच्या कार्यकुशलतेचा विकासासाठी उपयोग करून घेण्याची आता आवश्यकता आहे. डोंबिवली हे बांधकाम क्षेत्रासाठी सर्वात मोठी बाजारपेठ असून या शहरावरील विस्कळीतपणाचा डाग पुसण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

– राजन बांदेलकर, उपाध्यक्ष नारडेको