वसंतनगरी परिसरातील रहिवासी दरुगधीने त्रस्त; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

लोकसत्ता वार्ताहर

वसई : वसई पूर्वेतील वसंत नगरी परिसरात गटाराचे पाणी ओव्हरफ्लो होऊन थेट ये जा करण्याच्या रस्त्यावर येऊ लागले आहे. या दुर्गंधियुक्त पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य तयार होऊ लागले आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वसई पूर्वेतील भागात वसंत नगरी परिसर आहे. याभागात ५३ इमारती आहेत यामध्ये मोठय़ा संख्येने नागरी वस्ती आहे. या इमारतीमधून निघणारे सांडपाणी जाण्यासाठी गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु पाणी जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होत असल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी बाहेर पडू लागले आहे.

नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर आणि इमारतीच्या आवारात पसरले आहे.त्यामुळे येथून ये- जा करताना नागरिकांना दुर्गंधिचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे हे  घाणीचे सांडपाणी जमिनीत झिरपू लागले आहे. त्यामुळे पाण्याच्या भूमिगत टाक्याही प्रदूषित होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मागील काही महिन्यांपासून या समस्येला सामोरे जात आहोत.  या घाणीच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

यासाठी पालिकेने प्रकाराकडे लक्ष देऊन गटाराची स्वच्छता करून पाणी जाण्याचे मार्गरुंद करावेत अशी मागणी येथील रहिवासी निर्मेश राज यांनी केली आहे.वसंतनगरी येथे उभारण्यात आलेल्या गृह संकुलात  सांडपंपावे प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. मात्र हा प्रकल्प सहा ते सात वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे आता सांडपाण्यावर प्रक्रिया न होताच हे सर्व पाणी थेट नाल्यात सोडले जात आहे.  हा प्रकल्प पुन्हा सुरू करणे खर्चिक असल्याचे कारण देत फेडरेशने या प्रकरणातून  काढता पाय घेतला आहे.

उपसा पंप बसवून गाळ व पाणी काढण्यात आले आहे. बंद असलेला सांडपाणी प्रकल्प सुरू करण्याच्या संदर्भात बैठक घेतली जाईल.
-व्यंकटेश दुर्वास, सहआयुक्त प्रभाग समिती डी