शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता अधिकारी आल्याने तीव्र विरोध

ठाणे :  मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भिवंडी तालुक्यात १२ गावांमधील २६ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भिवंडीचे प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी येत्या १७ सप्टेंबर रोजी येथील ग्रामस्थांना बैठकीसाठी आमंत्रित केले असताना सोमवारी सकाळी राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाचे अधिकारी यापैकी काही गावांमध्ये दाखल झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी तीव्र निषेध करत आक्रमक भूमिका घेतली. शेतकरी आणि ग्रामस्थांचा नूर पाहून या अधिकाऱ्यांना अखेर त्यांची लेखी माफी मागावी लागली.

राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाने बुलेट ट्रेन प्रकल्पातील खासगी जागांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून भिवंडी तसेच आसपासच्या ग्रामस्थांच्या मनात या एकंदर प्रक्रियेविषयी अनेक शंका अजूनही कायम आहेत. या जागांची थेट खरेदी करताना होणाऱ्या मोजणीविषयी ग्रामस्थांच्या मनात संभ्रम असून यापूर्वी पर्यावरण आणि सामाजिक सर्वेक्षण अहवालासंबंधी झालेल्या सुनावणीतही हे मुद्दे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केले आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांची उत्तरे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून वेळेत देण्यात येत नसल्याने भिवंडीतील म्हातर्डी, भरोडी यासारख्या गावातील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध कायम आहे. हा वाढता विरोध लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या शेतकऱ्यांसोबत संवादाची भूमिका घेतली आहे.

या जागा मोजणीचा कार्यक्रम आखण्यापूर्वी प्रकल्पबाधित शेतकरी तसेच संघटनांशी चर्चा होणे महत्त्वाचे असल्याने भिवंडीचे प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी १७ सप्टेंबरला शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रणही दिले आहे. या बैठकीत राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात येणार आहे.

या बैठकीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला नेमका काय दर मिळणार, शेतजमिनीचा मोबदला बाजारमूल्याप्रमाणेच मिळायला हवा तसेच भरोडी ते म्हातर्डीपर्यंत सेवा रस्ता जोडताना या ठिकाणी पुलाची बांधणी करावी, अशा काही मागण्या या बैठकीत मांडण्यात येणार आहेत.

मात्र या बैठकीपूर्वीच बुलेट प्रकल्पाचे काही अधिकारी सोमवारी सकाळी भरोडी गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाहणीसाठी आले. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा पाहणीदौरा सुरू झाल्याने येथील ग्रामस्थांमध्ये याविषयी नाराजीचा सूर होता. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी सुरू केल्याने भरोडी गावातील शेतकरी काही वेळातच एकवटले आणि त्यांनी या प्रक्रियेचा निषेध नोंदविण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांकडून व्यक्त होणारी नाराजी आणि काही शेतकऱ्यांकडून मांडली जाणारी आक्रमक भूमिका पाहून यावेळी रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही वेळातच नमती भूमिका घेतली.

शेतकरी प्रतिनिधींनी यासंबंधी आपली नाराजी प्रांत अधिकारी आणि राष्ट्रीय रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे नोंदवली. त्यानंतर रेल्वे महामंडळाने ग्रामस्थ प्रतिनिधींकडे याविषयी लेखी नाराजी व्यक्त करत घटनास्थळावरून काढता पाय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

जमीन संपादनाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी शेतकरी संबंधित विभागाकडे सातत्याने काही प्रश्नांची उत्तरे मागत आहेत. यासंबंधी जिल्हा प्रशासनाने बैठकीसाठी वेळही दिली आहे. असे असताना शेतकऱ्यांना अंधारात ठेवून थेट जमिनीची पाहणी सुरू झाल्याने ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. त्यावर बुलेट ट्रेन प्रशासनाने शेतकऱ्यांचा लेखी माफीनामा सोमवारी लिहून दिला.

-अ‍ॅड. भारद्वाज चौधरी , संयोजक, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना