पक्षीसंवर्धनासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश

जयेश सामंत/किन्नरी जाधव

ठाणे : मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर राबवण्यात येणाऱ्या द्रुतगती रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पामुळे ठाणे खाडीतील फ्लेमिंगो तसेच अन्य पक्ष्यांच्या अधिवासाला मोठा धोका निर्माण होण्याची भीती आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातून निघणारा बुलेट ट्रेनचा मार्ग ठाणे खाडीतून ३० मीटर खोलीने कोपरखरणे, घणसोलीमार्गे शीळफाटय़ाच्या दिशेने जाणार आहे. मात्र, त्यामुळे ठाणे खाडीतील पक्षीजीवन संकटात सापडण्याची भीती असून या प्रकल्पासाठी सहा ठिकाणची सीआरझेड क्षेत्राची मर्यादा रेषाही बदलली जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर खाडीतील पक्षीसंवर्धनासाठी तातडीने व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश केंद्र सरकारने राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाला दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातील सुमारे  ७७.४५ तर गुजरातमधील सहा अशा एकूण ८३.५५ हेक्टर जंगलांमध्ये फेरफार करावा लागणार आहे. मात्र, या प्रकल्पाचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम ठाणे खाडीतील पर्यावरणावर होण्याची भीती आहे. या प्रकल्पातील सुमारे ५०८ किलोमीटर लांबीच्या संरेखनाची (अलाइनमेंट) सुरुवात वांद्रे-कुर्ला संकुलापासून होणार आहे. त्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातून हा मार्ग पुढे लावून गुजरातच्या वलसाड जिल्ह्य़ात प्रवेश करणार आहे. हा मार्गाचे संरेखन उंच पूल आणि भूयारी मार्गामधून पुढे सरकणार आहे. यामध्ये २५.४८ किलोमीटर लांबीचे तब्बल आठ बोगदे आखण्यात आले असून ठाणे खाडीच्या खालून ३० मीटर खोल जाणारा बोगदा सर्वात मोठा असणार आहे. हा बोगदा वांद्रे-कुर्ला संकुलापासून सुरू होऊन थेट कल्याण-शीळ मार्गावरील शीळफाटा येथे येऊन संपेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर हा मार्ग उंच पुलांचा असणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा मार्गापर्यंत भुयारी असणारा हा मार्ग ठाणे खाडीतून घणसोली, कोपरखैरणेच्या खाडीकिनारी असलेल्या खारफुटीचा ऱ्हास करत पुढे सरकणार आहे. पुढे महापेलगत असलेल्या आडीवली-भुतवली भागातील जंगलातून मार्गक्रमण करत द्रुतगती रेल्वे पुढे शीळफाटय़ाच्या दिशेने निघणार आहे. या मार्गात राज्य सरकारने फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केलेला ठाणे खाडीचा बराचसा ऱ्हास होणार असल्याने यावर उपाय शोधण्यासाठी वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पर्यायी संवर्धन आराखडे तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.

भरती नियंत्रण, पूर रेषाही बदलणार

हा मार्ग मिठी नदी, ठाणे खाडी, उल्हास नदीच्या वेगवेगळ्या पात्रातून जाणार असल्याने सहा-सात ठिकाणी खारफुटींची मोठी कत्तल होणार आहे. शिवाय किनारपट्टी नियंत्रण रेषाही बदलली जाणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलालगत असलेली मिठी नदी, ठाणे खाडी, भरोडी गाव, भिवंडी येथील केवणी, ब्राह्मणगाव या भागात उल्हास नदी तसेच विरार पट्टय़ात वैतरणा आणि भरुच भागात नर्मदा नदीपात्रातील सीआरझेड क्षेत्रातून द्रुतगती रेल्वेचा मार्ग जात आहे. यामुळे खारफुटीवर होणारा परिणाम लक्षात घेता संवर्धन आराखडय़ासाठी भारतीय खारफुटी मंडळाची मदत घेतली जात आहे.