अंबरनाथ तालुक्यातील प्रकार; पोलीस ठाण्यात गुन्हा

अंबरनाथ : ऐन टाळेबंदीतही बैलगाडा शर्यतींचे छुप्या पद्धतीने आयोजन करणाऱ्या आयोजकांची हिंमत गेल्या काही दिवसांत वाढल्याचे दिसून आले आहे. रविवारचा मुहूर्त साधत अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे येथे पुन्हा बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे. यंदा प्रेक्षकांच्या उपस्थितीत जंगी शर्यत पार पडली. याची माहिती मिळाल्यानंतर पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पोलीस प्रशासनाने पार पाडले. मात्र या शर्यतींच्या आयोजकांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

बैलगाडा शयर्तीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या बंदीला झुगारून राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे निदर्शनात आले आहे. यात ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ तालुका आघाडीवर असल्याचे गेल्या काही प्रकरणांवरून समोर आले आहे. तीन दिवसांपूर्वी रविवारचा मुहूर्त साधत अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात अशाच प्रकारे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे. उसाटणे गावाच्या शिवारात गुरचरणाच्या माळरानात सकाळी ९ ते १० च्या दरम्यान या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे करोनाच्या टाळेबंदीत गर्दी जमवणाऱ्या कार्यक्रमांना बंदी असतानाही या शर्यतीत मोठय़ा संख्येने नागरिक प्रेक्षक म्हणून सहभागी झाले होते. या शर्यतीची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हिललाइन पोलीस ठाण्यात उसाटणे गावातील रहिवासी प्रवीण काशिनाथ पाटील, सचिन विश्वनाथ भंडारी, गुरुनाथ वसंता पाटील, महेश गणेश पाटील यांच्यावर प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी शर्यतींचे पेव

विशेष म्हणजे टाळेबंदीच्या या काळात गेल्या काही महिन्यात पाच ते सहा शर्यतींचे प्रकार समोर आले आहेत. उसाटणे गावात वर्षभरात दुसऱ्यांदा शर्यत आयोजित केल्याचे दिसून आले आहे. उसाटणेसोबतच गेल्या काही दिवसात काकडवाल, करवले, अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील खुले मैदान, बदलापूरजवळील ग्रामीण भागातील गावांमध्ये अशा प्रकारच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. बदलापूर शहराच्या मध्यवर्ती कात्रप भागाशेजारील डोंगरालगतच्या भागात अशाच प्रकारे शर्यतींचे आयोजन करण्याचा प्रयत्न सुज्ञ नागरिकांच्या दक्षतेमुळे हाणून पाडण्यात आला. मात्र करोनाच्या टाळेबंदीतही जंगी बैलगाडी शर्यतींच्या आयोजनाची आयोजकांची हिंमत कशी होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.