अंबरनाथच्या ग्रामीण भागांतील आयोजकांवर गुन्हा दाखल

बैलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यात बैलगाडी शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या बंदीला फाटा देत अंबरनाथ तालुक्यात बैलगाडय़ांची शर्यती आयोजित करण्यात येत आहेत.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

बंदीला बैलगाडी शर्यत आयोजकांनी विरोध केला होता. पुढे न्यायालयाच्या आदेशानंतर बंदी कायम करण्यात आली. मात्र, आजही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने या शर्यती आयोजित केल्या जातात. यावर बक्षिसांच्या स्वरूपात लाखो रुपयांची उधळपट्टीही केली जाते. अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यांत या स्पर्धाचे मोठय़ा प्रमाणावर आयोजन केले जाते.

होळीच्या दिवशी अंबरनाथ तालुक्यातील उसाटने गावच्या वेशीवर अशीच स्पर्धा घेण्यात आली. याची माहिती मिळताच हिललाइन पोलिसांनी तिथे धाव घेतली. मात्र, पोलीस येत असल्याचे कळताच शर्यतीत सहभागी झालेल्यांनी व आयोजकांनी तिथून पळ काढला. केवळ एक छकडा पोलिसांच्या हाती लागला. या भागात शर्यतींसाठी धावपट्टी तयार करण्यात आली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी ही धावपट्टी खोदली होती. मात्र, पुन्हा याच ठिकाणी धावपट्टी तयार करण्यात आली होती.

याप्रकरणी, हिललाइन पोलीस ठाण्यात पाच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतले गेले नसून तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी विठ्ठल भोये यांनी दिली. दरम्यान, या शर्यतींच्या आयोजकांवर स्थानिक राजकारण्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे.

शेतघर मालकांना त्रास

कल्याण, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांसह अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळील एरंजाड, ढोके दापिवली, आंबेशिव आणि आसपाच्या परिसरांत मोठय़ा प्रमाणावर बैलगाडा शर्यती होत असल्याचे यापूर्वीही समोर आले होते. या भागात अनेक शेतघरे असून या शर्यतींचा त्रास शेतघर-मालकांना सहन करावा लागतो. मात्र स्थानिकांच्या भीतीने कुणी तक्रार करत नसल्याने कारवाई होऊ  शकत नव्हती.