म्हसाच्या जत्रेत बैलांच्या दरात निम्म्याने घसरण; शेतीचे यांत्रिकीकरण, शर्यतबंदी, दुष्काळाचा फटका

शेतीतील वाढते यांत्रिकीकरण आणि बैलांच्या शर्यतीवर केंद्र शासनाने घातलेली बंदी यामुळे ग्रामीण लोकजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलांचे बाजारमूल्य कमालीचे धोक्यात आले आहे. ठाणे जिल्हय़ातील सर्वात मोठय़ा मानल्या जाणाऱ्या मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेत अगदी पहिल्याच दिवशी बैलांचे भाव निम्म्याने घसरले असल्याचे चित्र दिसले. साधारणत: एक लाख रुपये जोडी भाव मिळेल, अशा अपेक्षेने बाजारात बैल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना यंदा जेमतेम ४० हजार रुपये मिळवितानाही बरीच यातायात करावी लागत आहे.
म्हसा यात्रेतील बैल बाजार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार मानला जातो. पुणे, नगर, रायगड आणि ठाणे या चार जिल्हय़ांतील हजारो शेतकरी बैलांची खरेदी-विक्री करण्यासाठी या बाजाराला भेट देत असतात. हल्ली ट्रॅक्टर व अन्य वाहनांमुळे बैलांचा शेतीत फार कमी वापर होतो. त्यामुळे प्रामुख्याने शर्यतींसाठी बैलांचा वापर होऊ लागला होता. म्हसा जत्रेत शर्यतीसाठी बैलजोडी घेण्यासाठी खूप लांबवरून लोक येत असत. मात्र आता शर्यतच नसल्याने बैलांचे बाजारमूल्य घसरून शेतकऱ्यांसाठी तो पांढरा हत्ती ठरू लागला आहे. याच वास्तवाचे सावट यंदा म्हसाच्या जत्रेतील जनावरांच्या बाजारावर आहे. ठाणे जिल्हय़ातील सर्वात मोठी असा लौकिक असणारी म्हसा यात्रा शनिवारपासून सुरू झाली. पौष पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या या यात्रेत पुढील १५ दिवस विविध जनावरांची खरेदी-विक्री होत असते. राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या चार राज्यांतील व्यापारी जत्रेत येत असतात. त्यात घोंगडय़ा, कपडे, खेळणी, विविध प्रकारच्या शोभिवंत वस्तूंची विक्री होते.
त्याचबरोबर रायगड, अहमदनगर, अकोला, बुलढाणा, पुणे आदी जिल्हय़ांतून आलेला शेतकरी वर्ग आपल्याकडील बैल व म्हशींची विक्री या बाजारात करतो. अनेक वर्षांची परंपरा असल्याने जवळपास पन्नास हजारांहून अधिक जनावरांची विक्री या बाजारात होते. खिल्लारी, डांगी, साहिवाल आदी प्रकारचे बैल या बाजारात असतात. यंदाही बाजारात २० हजारांपासून लाखांपर्यंतच्या किमतीचे हजारो बैल विक्रीस आले आहेत. मात्र त्या तुलनेत खरेदीदार नाहीत.

बैलांचे करायचे काय?
बैल बाजारात आलेल्या शेतकऱ्यांनी शर्यतबंदीवर नाराजी व्यक्त केली. मुरबाडमधील धसई येथून बैल विक्रीस घेऊन आलेले नरेश घोलप म्हणाले, माझ्या बैलाची किंमत २५ हजार रुपये आहे. मात्र बाजाराची अवस्था पाहता मला जेमतेम १५ हजारांत समाधान मानावे लागणार आहे. नेरळचे दत्ता गायकवाड व जितेंद्र मिणमिणे यांनी बाजारात जर त्यांना किंमत मिळणार नसेल तर या बैलांचे आम्ही करायचे काय, असा सवाल केला.