ठाणे जिल्ह्यात घरफोडींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या दोन दिवसांमध्ये ठाणे, कल्याण, उल्हासनगर परिसरामध्ये घरफोडीच्या सहा घटना घडल्या.
ठाणे पश्चिमेतील विठाई सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेच्या घरात भर दिवसा चोरीची घटना घटली. ही महिला ही घरी नसताना चोरांनी कलूप तोडून घरातील ६१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा येथील रशीद कपाऊंड परिसरात बुधवारी रात्री एका घरातील ६० हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला. कळवा येथे राहणाऱ्या एका तरुणाच्या घराचे कुलूप नकली चावीने उघडून चोरटय़ांनी चोरी केली.  यात घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण ४१ हजार रुपये किंमतीचा माल चोरीला गेला आहे. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोड परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या दुकानात चोरी झाली.  या दुकानातील ६१ हजारांचा माल चोरटय़ांनी चोरला असून याप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वाहतूक पोलिसाला ठाण्यात मारहाण
ठाणे : कापूरबावडी येथील गोल्डन डाईज नाक्यावर कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलीस विष्णू भुसारे यांना काही तरुणांनी मारहाण केली. कापूरबावडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या रस्त्यावर एका मोटारसायकलस्वाराला गुरुवारी त्यांनी थांबण्याचा इशारा दिला. तो न थांबता तसाच पुढे निघून जाण्याच्या प्रयत्नात असताना भूसारे यांनी त्याला अडविले. याचा राग येऊन या तरुणाने त्याच्या साथीदारांना बोलावून घेत भूसारे यांना मारहाण केली.

सोनसाखळी चोरीला
ठाणे – कोलशेत रोड परिसरात राहणाऱ्या महिलेचे ५० हजार रुपयाचे मंगळसूत्र चोरीला गेले. गुरुवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी ते खेचले. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणमध्ये मोटारसायकल चोरीला
कल्याण : पश्चिमेतील महालक्ष्मी निवास येथे राहणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीने सोमवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल ऑफिसजवळ मोटारसायकल उभी केली होती. मात्र ती चोरीला गेल्याने त्याने महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर येथील कॅम्प नं ५ मधील प्रेमनगर टेकडी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याची मोटारसायकल बुधवारी सकाळी घरासमोर उभी केली होती. तीचोरीला गेल्याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात त्याने गुन्हा दाखल केला आहे.