मुंबई-नाशिक महामार्गावर कार आणि टीएमटी बस यांचा भीषण अपघात झाला. दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोन्ही जखमींना मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विक्रांत सिंग, डोंबिवली (२४), नीरज पांचाळ, मिरारोड (२३), मिहीर उतेकर, मिरारोड (२३), निरव मेहता सुरत गुजरात (२३) यांचा अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातात वैभव छेडा (२४), रमेश पटेल (२२), आणि संतोष मिश्रा (२४) असे एकूण ३ जण जखमी झाले असून यातील गंभीर जखमी असणाऱ्या दोघांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर एकाला डोंबिवली समता रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

होंडा सिटी कार क्रमांक एमएच-०४-एल-२७४२ या कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. टायर फुटल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजक तोडून विरुध्द दिशेने येणाऱ्या ठाणे-अलिमघर या टीएमटी बस क्रमांक एमएच- ०४-जी-८००२ ला धडकली. या दुर्घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारमधील मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर हे मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातानंतर भिवंडी-ठाणे दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.