पेणकर पाडय़ातील नागरिकांच्या अर्ज-विनंत्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

भाईंदर : अनेक वेळा सातत्याने तक्रार करूनदेखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर  कंटाळून  पेणकर पाडय़ातील स्थानिक युवकांनी चक्क स्वत: बस थांब्याची निर्मिती करून प्रशासनाला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले.

मीरा रोड येथील पेणकर पाडा गावात साधारण २५ हजार नागरिकांचे वास्तव्य आहेत. पेणकर पाडा हे रेल्वे स्थानकापासून लांब असल्यामुळे या भागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात बस सेवांचा लाभ घेत असतात. परंतु या गावात अद्यापही प्रशासनाकडून बस थांब्याची निर्मिती करण्यात आली नाही.

केवळ बस थांब्याच्या नावावर उभारण्यात आलेल्या लोखंडी खांबाच्या भोवतीच नागरिक उभे राहत आहेत. त्यामुळे उन्हा—पावसात नागरिकांना मोठय़ा समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच अरुंद रस्ता असल्यामुळे जिवाचा धोकादेखील निर्माण झाला आहे.

यामुळे पेणकर पाडा गावात प्रशासनाकडून बस थांब्याची निर्मिती करण्याची मागणी नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. या संदर्भात लोकसत्ता वृत्तपत्रात बातमीदेखील प्रकाशित करण्यात आली होती. परंतु तरीदेखील  प्रशासनाकडून दखल घेण्यात न आल्यामुळे रविवारी स्थानिक तरुण मुलांनीच  बांबू आणि ताडपत्रीच्या साहाय्याने चक्क बस थांबा उभा

केला. त्याच प्रकारे आता तरी लवकरात लवकर बस थांबायची निर्मिती करण्याची मागणी प्रशासनाला तरुणांनी केल्याने नागरिकांचे प्रशासनाकडे लक्ष लागले आहे.