विरार : वसईत एका महिला  व्यावसायिकाची सफरचंद खरेदी विक्रीच्या व्यवसायाखाली ३५ लाखाची फसवणूक  झाल्याची घटना  समोर आली आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

नायगाव पूर्व येथे राहणारम्य़ा सिमरन हर्षित पारेख (३९) या  महिलेला आपला स्वताचा व्यवसाय वाढविण्यासाठी काहीतरी नवीन उपक्रम करण्याचे ठरविले होते. दरम्यान या बाबत शोध घेत असताना तिची ओळख गुजरातमधील सफरचंद फळाचा व्यापारी कल्पेश जानी याच्याशी झाली.

कल्पेशने सफरचंदाच्या व्यवसायात मोठा नफा मिळतो असे आमिष दाखवत सिमरनला या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार सिमरन आणि त्यांच्या पतीने जाणीवर विश्वास ठेवत ऑनलाईन पद्धतीने जानीच्या बँक  खात्यात हळूहळू ३५ लाख रुपये जमा केले.

दरम्यान सहा महिने उलटूनही जानी खरेदी केलेला माल विकत नसल्याने सिमरनला संशय आला, आणि त्यांनी जानीला या संदर्भात विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आणि नंतर त्यांचा दूरध्वनी घेणे बंद केले,  त्यांनी गुजरातमध्ये जाऊन पाहणी केली असता जानी हा कोणी व्यापारी नसून केवळ एक कर्मचारी असल्याचे त्यांना कळले.