दहावी, बारावी अनुत्तीर्ण झाल्यामुळे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे.. आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण अध्र्यातच सोडावे लागले आहे.. पदवी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नोकरी मिळत नाही.. अशा अनेक कारणांमुळे बेरोजगार असा शिक्का बसलेल्या तरुण-तरुणींची कारकीर्द उज्ज्वल करण्यासाठी ठाण्यातील उद्योजकांनीच आता पुढाकार घेतला आहे. ‘चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन’ (कोसिआ) या उद्योजकाच्या संघटनेने मुंबई, ठाणे पट्टय़ातील तरुण-तरुणींसाठी विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग राबवण्याचे ठरवले असून प्रशिक्षणानंतर त्यांना रोजगार मिळवून देण्याचीही तयारी दर्शवली आहे. मुंबई, ठाणे, अंबरनाथ, वसई आणि तारापूर या भागांतून यंदा १५ हजार तरुणांना प्रशिक्षित करण्याचा विडा ‘कोसिआ’ने उचलला असून यापैकी ४० टक्के तरुण स्वत:चा उद्योग सुरू करण्याइतपत प्रशिक्षित होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सध्याच्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी पदवी मिळविण्यात तर यशस्वी होतात, मात्र त्याला प्रात्यक्षिकांची जोड नसल्याने संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कामात ते अपयशी ठरतात. याचा फटका या तरुणांसोबत त्यांना नोकरीवर घेणाऱ्या उद्योग कंपन्यांनाही बसतो. या समस्येवर मात करण्यासाठीच तरुणांना कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण देण्याचे ‘कोसिआ’ने ठरवले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून विनामूल्य प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून अनामत स्वरूपात एक हजार रुपये शुल्क घेतले जाणार असून ती रक्कम अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना परत केली जाणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक जयदीप कोर्डे आणि संघटनेचे निनाद जयवंत यांनी दिली. तसेच प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना अनामत रक्कम भरण्यातूनही सूट देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास अभ्यासक्रम

’प्रशासकीय : अकाऊंटस् असिस्टंट अ‍ॅण्ड टॅली ऑपरेटर, टॅक्सेशन विथ एक्स्पोर्ट अ‍ॅण्ड इम्पोर्ट डॉक्युमेन्टेशन, आयएसओ कम्प्लाइन्स ट्रेनिंग

’अभियांत्रिकी : मोटार रिवायंडिंग अ‍ॅण्ड रिपेअर, वेल्डिंग टेक्नॉलॉजी, फिटर, शीट फॅब्रिकेशन, प्लास्टिक मोल्डिंग ऑपरेटर

’बांधकामनिर्मिती : इलेक्ट्रिकल वायरमन, एल.ई.डी. असेम्ब्ली अ‍ॅण्ड रिपेअर, प्लम्बिंग, सुतारकाम

’देखभाल दुरुस्ती : टू व्हीलर- थ्री व्हीलर मेकॅनिक, मोबाइल फोन रिपेरिंग, कॉम्पुटर हार्डवेअर अ‍ॅण्ड नेटवर्किंग, सव्‍‌र्हिसिंग ऑफ रेफ्रिजरेटर अ‍ॅण्ड एअर कंडिशनर

’महिलांसाठी : पॅटर्न मेकिंग, शिवणकाम, सौंदर्यशास्त्र

’सेवाक्षेत्र : हॉटेल हॉस्पिटॅलिटी, बेकरी उद्योग

‘कोसिआ’त प्रवेशासाठी..

प्रत्येकी तीन महिन्यांचे हे अभ्यासक्रम असतील. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी तरुणांनी सहभागी संस्थांच्या कार्यालयात संपर्क साधावा. शिवाय ठाण्यातील टीसा संस्थेच्या कार्यालयातही यांची माहिती मिळू शकेल. ‘कोसिआ’ दूरध्वनी क्रमांक-  ०२२/२५८२०४२९, जयदीप कोर्डे- ९८२०१८७७२१.