News Flash

ऐन हंगामात कृषी पर्यटन कचाटय़ात

ठाणे जिल्ह्य़ातील केंद्रचालकांचे लाखोंचे नुकसान

ठाणे जिल्ह्य़ातील केंद्रचालकांचे लाखोंचे नुकसान

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर :  ठाणे जिल्ह्य़ातील उल्हास आणि बारवी नदीच्या शेजारी अनेक शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन केंद्रे विकसित केली आहेत. मात्र, जगभरात थैमान घालणाऱ्या करोनामुळे उद्य्ोगधंद्याप्रमाणे या शेतीपूरक व्यवसायालाही फटका बसला असून मुंबई आणि उपनगरातील पर्यटकांच्या पसंतीस उतरणारी ही केंद्रे ऐन हंगामात ओस पडली आहेत. गेल्या जुलै महिन्यातल्या पुरानंतरचा शेतकऱ्यांना हा दुसरा मोठा धक्का बसला आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील निसर्गरम्य तालुके म्हणून ओळख असलेल्या अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यात अनेक कृषी पर्यटन केंद्रे विकसित झाली आहेत. टाटा विद्युत प्रकल्प, आंध्र आणि बारवी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे बारमाही झालेल्या उल्हास आणि बारवी नदी किनारी गेल्या काही वर्षांत अनेक कृषी पर्यटन केंद्रे उभी राहिली. दोन ते तीन दिवसांचा निवांत क्षण आणि विरंगुळा मिळण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील अनेक पर्यटक या कृषी पर्यटन केंद्राना हजेरी लावतात. मात्र, गेले वर्षभर या कृषी पर्यटन केंद्रांची वाताहत झाली आहे. गेल्या वर्षी पावसाळय़ात दोनदा आलेल्या पुरामुळे अनेक कृषी पर्यटन केंद्रांचे नुकसान झाले होते. केंद्रचालक शेतकऱ्यांनी पदरमोड करून पर्यटन केंद्रांचे नूतनीकरण केले. त्यावेळी त्यांची भिस्त उन्हाळय़ाच्या सुट्टीत येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवर होती. मात्र, मार्च महिन्यापासून लागू झालेल्या टाळेबंदीमुळे या केंद्रचालकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

एकीकडे, ठप्प झालेले उत्पन्न आणि दुसरीकडे पर्यटन केंद्राच्या देखभालीचा नियमित खर्च अशा कात्रीत पर्यटन केंद्र व्यावसायिक सापडले आहेत. ‘करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा पत्ता नसून शेकडो एकरावर पसरलेले हे कृषी केंद्र सांभाळणे आता अशक्य होऊ  लागले आहे,’ असे वांगणीजवळच्या कृषी पर्यटन केंद्राचे दिलीप देशमुख यांनी सांगितले. येथे फणस, आंबे, चिकू, काजू, लिंबू आणि काही भाज्या हे आमचे दुसरे उत्पन्न होते. मात्र, त्यांनाही खरेदीदार नसल्याचे रमेश देशमुख यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2020 3:39 am

Web Title: business related agriculture also hit by coronavirus zws 70
Next Stories
1 डोंबिवलीत आठ तास वीज गायब
2 करोना तपासणी प्रयोगशाळेतील डॉक्टरांचा कुटुंबापासून दुरावा
3 Coronavirus Outbreak : संशयितांचे घरीच विलगीकरण
Just Now!
X