फुलपाखरू.. कुणाला आवडत नसावे बरे! प्रत्येकालाच आवडते. अगदी लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वानाचा हवेत भिरभिरणारे रंगबेरंगी फुलपाखरू पाहण्यात, त्याचे निरीक्षण करण्यात रस असतो. पण एकाच वेळी विविध रंगांची, विविध आकारांची, विविध प्रजातींची फुलपाखरे पाहायची असतील तर ठाण्यातील ‘ओवळेकरवाडी फुलपाखरू उद्यान’ याशिवाय दुसरा पर्याय नाही. दोन एकरामध्ये वसलेल्या या फुलपाखरू उद्यानात असंख्य फुलपाखरे भिरभिरताना दिसतात..पण त्याशिवाय येथे मिळते फुलपाखरांच्या जगाची, त्यांच्या दैनंदिन उपक्रमाची माहिती तीही प्रात्यक्षिकासह. म्हणजे केवळ पिकनिक म्हणून नव्हे तर फुलपाखरांचा आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे.
फुलपाखरू उद्यान म्हटले की आपल्याला मुद्दाम तयार केलेली ‘लॅण्डस्केप गार्डन’ आठवतात. नानाविध रंगांची फुलपाखरे एकाच वेळी पाहता यावी यासाठी अशा प्रकारचे उद्यान परदेशात बनविले जाते; परंतु त्यात कृत्रिमपणा असतो. ओवळेकरांच्या बागेत मात्र नैसर्गिकपणे फुलपाखरे येतात. याचे कारण म्हणजे फुलपाखरांना आकर्षिक करण्यासाठी येथे नानाविध प्रयोग करण्यात आले आहेत.
पेशाने शिक्षक असलेल्या राजेंद्र ओवळेकर यांनी आपल्या वडिलोपार्जित दोन एकर शेतीमध्ये हे उद्यान फुलविले आहे. निसर्गाची आवड असलेल्या ओवळेकरांनी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या ‘फुलपाखरांची ओळख’ या कार्यक्रमाला भेट दिली आणि त्यांचे मन फुलपाखरांविषयी आकर्षित झाले आणि त्यांनी या फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केली. फुलपाखरू कोणत्या फुलांकडे, वृक्षांकडे आकर्षित होते, कोणत्या झाडावर, वेलीवर फुलपाखरू अंडी घालते याचा सर्वागीण अभ्यास करून त्यांनी ही बाग फुलविली आहे. या बागेत विविध प्रकारची झाडे, वेली असून त्याखाली त्यांची नावे आहेत. काही फुलपाखरे केवळ फळांतील रस शोषून घेतात, त्यामुळे ओवळेकरांनी जागोजागी जाळीदार भांडी अडकवली असून, त्यात केळी, अननस, चिकू, पपई अशा प्रकारची फळे ठेवली आहेत. काही फुलपाखरे मांसाहारी असल्याने या भांडय़ांमध्ये मेलेले खेकडे, कोळंबी असेही भरून ठेवले जाते.
या बागेत आल्यानंतर केवळ विविध प्रकारच फुलपाखरे पाहायला मिळत नाही तर त्यांची नावे, ती कोणत्या प्रकारची आहेत यांची इत्थंभूत माहिती ओवळेकरांकडून मिळते. त्यासाठी ओवळेकर आधी तासभर फुलपाखरांविषयी व्याख्यान देतात आणि त्यानंतर या बागेची सफर घडवून आणतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडून फुलपाखरांची अंडी, त्यांची अळी, कोश आणि त्यानंतर फुलपाखरू पाहायला मिळते. एखादे फुलपाखरू कोशातून बाहेर पडल्यानंतर त्याला हवेत सोडण्याचा कार्यक्रमही येथे होतो. या बागेत ब्लू टायगर, प्लेन टायगर, किंग क्रो, जॅझेंबेल, ग्रेट एग प्लॉय, टॉनी कॉस्टर, कॉम मॉटमॉन, कॉमन रोझ आणि इतर विविध प्रजातींची फुलपाखरे येतात. या फुलपाखरांची इत्थंभूत माहिती ओवळेकरांना असते. त्यामुळे त्यांच्यासोबत फिरताना एका अद्भुत सफरीचा आनंद मिळतो.
भारतातील आकाराने सर्वात मोठे असलेले आणि महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले ‘ब्लू मॉरमॉन’ हे फुलपाखरूही येथे पाहायला मिळते. ‘ब्लू ओकलिफ’ नावाचे एक वेगळ्याच प्रकारचे फुलपाखरू येथे पाहायला मिळते. एखाद्या झाडावर किंवा फळावर अन्नग्रहण करण्यासाठी बसले की हे फुलपाखरू सुकलेल्या पानासारखे दिसते. मात्र पंख उघडल्यावर त्याचा विशिष्ट निळा रंग दिसतो. अतिशय सुंदर असलेले हे फुलपाखरू म्हणजे निसर्गाची किमयाच!
निसर्गचक्र सुरू ठेवण्यात फुलपाखरांचा मोठा वाटा आहे. फुलपाखरे असतील तर त्यांवर जगणारे पक्षी आणि इतर प्राणी येथे येतील आणि निसर्गाचे चक्र सुरू राहील, असे ओवळेकरांना वाटते. त्यांनी फुलपाखरांचा ध्यासच घेतला आहे. त्यासाठी प्रत्येकाने झाड लावा, असा सल्ला ते देतात. लिंबू, कढिपत्ता, कृष्णकमळ, पानफुटी यांसारख्या झाडांवर फुलपाखरे येतात. त्यामुळे तुमच्या गॅलरीत या झाडांना स्थान द्या, असे ते सांगतात. अनेक निसर्गप्रेमी, अभ्यासक, छायाचित्रकार, पर्यटक, फिरस्ते त्यांच्या या बागेला भेट देतात.

कसे जाल?
’ ठाण्याहून मीरा-भाईंदर, बोरिवलीकडे जाणाऱ्या बस ओवळा नाक्यावर थांबतात. या नाक्यावरून उजवीकडील रस्त्यावरून १० मिनिटे चालत ओवळा गावात गेल्यावर हे फुलपाखरू उद्यान लागते. बागेवरील प्रवेशद्वारावरच ‘ओवळेकर वाडी : फुलपाखरांची बाग’ असे लिहिलेले आहे.
’ वेळ : रविवारी, सकाळी ९ ते दुपारी १.
’ प्रवेश शुल्क : १०० रुपये.

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
how Screaming is good for your health
Screaming : ‘किंचाळणे’ किंवा ‘ओरडणे’ आपल्या आरोग्यासाठी आहे चांगले; घ्या जाणून तज्ज्ञांनी सांगितलेले कारण…
Those who violate the rules of cleanliness will get fine receipt online
मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…