News Flash

फडके, सावरकर रस्त्यांवर दुचाकीस्वारांचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत अशाच दुचाकीस्वारांचा उपद्रव वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ठाण्यातील उपवन परिसरात वेगाने दुचाकी चालविणाऱ्यांना रोखण्यासाठी सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना रस्त्यावर उतरावे लागल्याची घटना ताजी असताना गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत अशाच दुचाकीस्वारांचा उपद्रव वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे. एरवी गर्दीचा आणि वर्दळीचा समजला जाणारा फडके रस्ता, सावरकर रस्ता रात्री उशिरा काहीसा मोकळा होताच वेगाने दुचाकी चालविणारे तरुण येथे दाखल होतात. यामुळे रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या डोंबिवलीकरांना त्रास होऊ लागला आहे.
रात्री नऊ वाजल्यानंतर हे दुचाकीस्वार रस्त्यावर घिरटय़ा घालण्यास सुरुवात करतात. या वेळेत रस्त्यावरील वाहने, प्रवाशांची वर्दळ कमी झालेली असते. त्याचा लाभ उठवत हे दुचाकीस्वार बेफाम वेगाने वाहने चालवीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वाहने चालविताना मुद्दाम एक्सलेटर वाढवून गाडीतून आवाज काढण्याचे प्रकार या स्वारांकडून करण्यात येत आहेत. स्थानिक वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी बघ्याची भूमिका घेतली आहे. फडके तसेच सावरकर रोड परिसरात रात्री दहानंतर शांतता असते. या मार्गावरून वेगाने बाइक चालविणाऱ्या स्वारांमुळे शांततेच्या शोधात असणाऱ्या डोंबिवलीकरांचा निद्राभंग होण्याचा प्रकारही वाढला आहे. पोलीस, वाहतूक विभागाने या दुचाकीस्वारांचा बंदोबस्त करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. जे दुचाकीस्वार वेगावर नियंत्रण न चालविता वाहने चालवितात त्यांना तात्काळ थांबवून समज दिली जाते. पुन्हा असा प्रकार त्याच दुचाकीस्वाराकडून झाला असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, असे एका वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 12:53 am

Web Title: byke rider claimed fadke saverkar road
Next Stories
1 श्रमजीवी संघटनेकडून आदिवासी मंत्र्यांचा निषेध
2 गुन्हेवृत्त
3 पर्यावरणविषयक चित्रपट महोत्सवास चांगला प्रतिसाद
Just Now!
X