|| मयूर ठाकूर

मीरा-भाईंदर शहरातील झाडांवर महापालिकेचे लक्ष नसल्याने केबल आणि इंटरनेटधारकांनी आपल्या फायद्यासाठी झाडांना इजा पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. मीरा-भाईंदर शहरामध्ये अनेक ठिकणी झाडांवर टीव्ही केबल आणि इंटरनेट तारांचा विळखा बसला आहे. यामुळे या झाडांना धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून झाडांचे संवर्धन व जतन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. अनेक झाडांना टीव्ही केबलचा विळखा बसला आहे. अनेक दुकानदार, हॉटेल व बार व्यवसायिक यांनी सर्रास सार्वजनिक पालिकेच्या झाडांचा वापर विद्युत रोषणाईसाठी चालवला आहे. स्वत:च्या दुकान- हॉटेलाच्या सौंदर्यीकरण आणि जाहिरातबाजीसाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी झाडांवर बेकायदा विद्युत तोरणे लावली जात आहेत. यामुळे झाडांचे आयुष्यमान कमी होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

मीरा-भाईंदर महानगरपालिका परिसरातील अनधिकृत केबलवर कारवाई करण्यासाठी जानेवारी महिन्यात महासभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. परंतु अद्यापही त्यावर कारवाई केली जात नसल्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे समोर आले आहे. शहरातील अनेक राजकीय नेत्यांचा केबल व्यवसाय असल्यामुळे राजकीय दबावामुळे कारवाई केली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

झाडांवर टीव्ही केबला विळखा असल्यास लवकरच कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. – बालाजी खतगावकर, आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका