|| पूर्वा साडविलकर

ठाणे स्थानक परिसरात विविध सुविधांच्या ‘पावडर रुम’ नवउद्यमास आरंभ :- ठाणे महापालिकेने महिलांसाठी शहरात सुरू केलेल्या विश्रांती कक्षांचा पुरेशा देखभालीअभावी पुरता बोऱ्या वाजला असताना रेल्वे स्थानक परिसरात एका खासगी कंपनीने महिलांसाठी प्रसाधनगृहांसह सुरू केलेला विश्रांती कक्ष सध्या चर्चेत आहे. ‘पावडर रूम’ नावाने सुरू केलेल्या या अभिनव प्रकल्पात महिलांसाठी छोटासा कॅफे, मेक-अपसाठी (रंगभूषा) खास व्यवस्था, तसेच विश्रांती कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. हा संपूर्ण कक्षात संगीताची धून ऐकू येणार आहेत. रेल्वे स्थानक परिसरात सुरू झालेल्या या नवउद्यमाला (स्टार्ट अप) महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांमधून रोज प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी स्थानक परिसरात स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध नाहीत. अस्वच्छता, दरुगधी आणि अपुऱ्या सुविधांमुळे या त्यांचा वापर करणेही अनेकदा टाळले जाते. अशावेळी अनेकदा महिलांना स्वच्छतेसाठी प्रसाधनगृहात जावेसे वाटत असते. मात्र तेथील अस्वच्छतेमुळे आणि अपुऱ्या सुविधांमुळे महिला प्रसाधनगृहात जाण्याचे टाळतात. या सर्व गोष्टींचा विचार करून ‘लूमण्ड अँड व्हिवर रिटेल’ या कंपनीच्या वतीने‘वुलू’ ही ‘विमेन पावडर रूम’ ही खास महिलांनी महिलांसाठी निर्माण केलेला प्रकल्प ठाणे स्थानक आवारात सुरू करण्यात आला आहे. महिलांसाठी सुरक्षितता आणि आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या पावडर रूमची निर्मिती केल्याची माहिती वुलूच्या सहसंस्थापिका शिवकला मुदलीयार यांनी दिली.

प्रकल्प काय?

राणी व्हिक्टोरियाच्या काळात प्रसाधनगृहांना ‘पावडर रूम’ असे म्हटले जात होते. या पावडर रूममध्ये महिलांसाठी स्वच्छतेबरोबरच आवश्यक अशा सुविधाही या ठिकाणी उपलब्ध असतात. अशाच पावडर रूमची निर्मिती ठाणे शहरात करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात आलेल्या महिलांना स्वच्छतागृहासह अनेक सुविधांचा लाभ या प्रकल्पाच्या माध्यमातून घेता येणार आहेत. या ठिकाणी कॅफेची व्यवस्था असून अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटके वातावरण येथे असेल. दमल्या-भागलेल्या महिलांना अनेकदा नव्या इच्छितस्थळी जाताना नव्याने मेक अप करण्याची गरज भासते. त्यामुळे याठिकाणी खास मेक अप व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.