19 February 2019

News Flash

गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘कॅमेरा’ योजना

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी वसई पोलिसांनी आता ‘एक कॅमेरा शहरासाठी’ ही अभिनव योजना आणली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दुकानात, इमारतींमध्ये सीसीटीव्ही लावताना रस्त्याच्या बाजूने अतिरिक्त कॅमेरा लावण्याचे आवाहन

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी वसई पोलिसांनी आता ‘एक कॅमेरा शहरासाठी’ ही अभिनव योजना आणली आहे. सुरक्षेसाठी लोक आपल्या दुकानात, इमारतीत कॅमेरा लावतात. असे कॅमेरे लावताना एक अतिरिक्त कॅमेरा शहरासाठी लावावा, ज्याचा फायदा गुन्हेगारी रोखण्यात होईल, अशी ही योजना आहे.

वसई-विरार शहरातील लोकसंख्या वेगाने वाढत असून गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. पोलीस बळ अपुरे असून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे कठीण होऊ  लागले आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्त्यावर सोनसाखळी चोरी, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, छेडछाड आदी घटना वाढत आहे. असे गुन्हेगार पळून जाताना त्यांची ओळख पटणे कठीण होऊन बसते. सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास गुन्हेगारांना अटकाव होतो तसेच जेवढे जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील, तेवढे पोलिसांना लक्ष ठेवण्यास, गुन्हेगारांचा माग घेण्यास सोप्पे होत असते. मागील वर्षी पालघर पोलिसांनी नागरिकांच्या सहभागातून सीसीटीव्ही उभारण्याचा प्रयोग सुरू केला होता. मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी ‘एक कॅमेरा शहरासाठी’ ही योजना आणली आहे. वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी ही संकल्पना मांडली आहे.

नवीन योजनेत नागरिकांनी कुठले सीसीटीव्ही कॅमेरे लावावे त्याचे बंधन नाही. त्याचे नियंत्रण संबंधित नागरिकांकडेच असणार आहे. यामुळे ‘एक कॅमेरा शहरा’साठी ही योजना यशस्वी होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पूर्वीची योजना बारगळली

गेल्या वर्षी तत्कालीन पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी पालघर जिल्ह्य़ात सीसीटीव्ही जाळे उभारण्याची योजना आखली होती. जिल्ह्य़ातल्या २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीसीटीव्ही लावण्याची ठिकाणे पोलिसांनी निश्चित केली होती. या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण संबंधित पोलीस ठाण्यात उभारलेल्या नियंत्रण कक्षातून ठेवले जाणार होते. या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या खर्चाने सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. कारण सीसीटीव्ही कुठले लावायचे, त्याचे तांत्रिक मूल्यांकन (टेक्निकल स्पेसिफिकेशन, लेन्स आणि मेगापिक्सल) प्रत्येक पोलीस ठाण्यामार्फत निश्चित केले जाणार होते. ज्या नागरिकांना सीसीटीव्ही स्वखर्चाने लावायचे आहेत, त्यांनी आपल्या भागातील स्थानिक पोलीस ठाण्याची संपर्क साधून ही तांत्रिक माहिती आणि ठिकाण माहीत करून घ्यायचे होते. पण पोलिसांनी सांगितलेल्या निकषानुसारच सीसीटीव्ही लावायचे आणि पोलिसांशी संपर्क करायचा हे नागरिकांना कठीण जात होते. ही योजनाही चांगली होती. मात्र लोकप्रतिनिधी ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचवू शकले नाही आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही.

काय आहे ही योजना?

सुरक्षेसाठी दुकानात आणि इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. त्यामुळे दुकानात आणि इमारतीत नजर ठेवली जाते. मात्र बाहेर काय चालले आहे, ते समजत नाही. यासाठी लोकांना दुकानात आणि इमारतीत कॅमेरा लावताना एक कॅमेरा बाहेरच्या दिशेने लावावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. जर दुकानात पाच कॅमेरे असतील तर एक कॅमेरा बाहेरच्या दिशेने असावा, जेणेकरून बाहेरील सर्व हालचाली टिपल्या जातील आणि गुन्हेगारांनाही पकडणे सोपे होईल, असे या योजनेची माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले. यामुळे जसा पोलिसांना फायदा होईल, तसा तो दुकानदारांना होणार आहे. कारण दुकानाच्या आत काय चालले आहे ते समजेलच शिवाय दुकानाच्या बाहेर, रस्त्यावर काय चालले आहे तेही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरू शकणार आहे.

First Published on September 4, 2018 1:21 am

Web Title: camera program to prevent crime