ठाणे पोलिसांचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

ठाणे : वाहतूक सुधारणा तसेच गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरात १५० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे. यापैकी १२८ कॅमेरे वाहन क्रमांक ओळखणारे (एएनपीआर) आणि २२ कॅमेरे हे व्यक्तीचे चित्रीकरण सुस्पष्ट दर्शविणारे (पीटीझेड) असणार आहेत. या संदर्भाचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी गृह विभागाकडे पाठविला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांत हे कॅमेरे कार्यान्वित करण्यात येतील.

ठाणे शहरात महापालिकेकडून १ हजार ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यातील अनेक कॅमेरे कमी दर्जाचे आहेत. त्यातून केले जाणारे चित्रीकरण सुस्पष्ट नसते. अनेक कॅमेरे बंद अवस्थेतच असल्याने या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात उपयोग होत नाही. काही महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या बैठकीत ही अडचण मांडली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागामार्फत मंजूर केला होता. ठाणे पोलिसांनी आता गृह विभागाकडे या संदर्भाचा प्रस्ताव पाठविला आहे. गृह विभागाची मंजुरी मिळाल्यास अवघ्या दीड ते दोन महिन्यांत प्रशासनाकडून हे कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या कॅमेऱ्यांमध्ये १२८ कॅमेरे ‘एएनपीआर’ स्वरूपातील असणार आहेत, तर २२ कॅमेरे हे ‘पीटीझेड’ स्वरूपातील असणार आहेत, अशी माहिती ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

कॅमेऱ्यांची वैशिष्ट्ये

ल्ल दीडशे कॅमेऱ्यांपैकी १२८ कॅमेरे हे ‘ऑटोमेटिक नंबरप्लेट रेकग्निशन’ (एएनपीआर) तंत्रज्ञानाने सज्ज असतील.एखाद्या वाहनचालकाने सिग्नल ओलांडला किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. तर त्या व्यक्ताचा वाहन क्रमांक ‘एएनपीआर’ कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांकडे जाणार आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलिसांना कारवाई करणे सोपे होईल.

ल्ल उरलेले २२ कॅमेरे हे ‘पॅन, टिल्ट अ‍ॅण्ड झूम’ (पीटीझेड) या स्वरूपाचे असून या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून एखाद्या ठरावीक व्यक्तीवर फोकस ठेवून त्याच्या सर्व हालचाली टिपता येतात.