जव्हारमध्ये युवा महोत्सवाचा जल्लोष
मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि जव्हार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या झोन क्रमांक नऊची प्राथमिक फेरी पार पडली. या फेरीत एकूण ललित कला, समूह गीत, शास्त्रीय व लोकनृत्य आणि इतर असे एकूण १६ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जव्हार, गोवेली, मोखाडा, पालघर, शहापूर येथून १३ महाविद्यालयांतील जवळपास २०० विद्यार्थ्यांनी  प्राथमिक फेरीत सहभाग नोंदवला.या स्पर्धेत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पडघा यांनी तीन पारितोषिके जिंकली. जेएसएसपी महाविद्यालय खर्डी येथील नरेंद्र पवार या विद्यार्थ्यांने भित्तीपत्रक आणि चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, तर रांगोळी स्पर्धेत सचिन चौधरी या विद्यार्थ्यांने दुसरा क्रमांक मिळवून हे विद्यार्थी अंतिम फेरीत दाखल झाले. जव्हार महाविद्यालयाने क्ले मॉडलिंग, समूह गायन या स्पर्धेत दोन पारितोषिके मिळवली. आणि महाविद्यालयाच्या मनीषा गोतरणे व जगदीश भुसारा या विद्यार्थ्यांची गायन स्पर्धेत अंतिम फेरीसाठी थेट निवड करण्यात आली. यात जव्हारच्या गोखले शिक्षण संस्था महाविद्यालयाने पाच स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावून विभागीय चषक पटकावला. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मृदुल निळे, युवा महोत्सवाचे समन्वयक प्रा. नीलेश सावे, विभाग क्रमांक नऊच्या प्रा. प्रज्ञा कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळावे, विद्यापीठ पातळीवर त्यांना संधी मिळावी, म्हणून नववा विभाग सुरू करण्यात आला असून या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कलर्स टी.व्ही. वरील ‘तू माझा सांगाती’ या मालिकेचे दिग्दर्शक आणि स्पर्धेचे परीक्षक रघुनंदन बर्वे  तसेच सारेगमप स्पर्धेतील उपविजेता प्रल्हाद जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टा मूर्तिमंत प्रतीक
रेडिओ जॉकी जीतू राजचे प्रतिपादन
कट्टा हा नेहमीच व्यक्त होण्याचे स्थान असते त्यामुळे त्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून पाहिले पाहिजे. ठाण्यातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांसाठी असा मंच उपलब्ध करून देणे म्हणजे विद्यार्थ्यांना कलेच्या व सांस्कृतिक क्षेत्रात पादर्पण करण्यापूर्वीची एक ‘पाठशाळा’ घेण्यासारखे आहे, असे मत रेडिओ मिर्चीचे आकाशवाणी निवेदक (रेडीओ जॉकी) जितू राज यांनी व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळाच्या स्थापना दिनानिमित्ताने मंडळाच्या बांदोडकर महाविद्यालयात ‘बांदोडकर कट्टय़ाची’ सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित जितू राज याने तरुणांशी संवाद साधत त्यांची मने जिंकली.विद्या प्रसारक मंडळाचा स्थापना दिवस नुकताच पार पडला. त्या निमित्ताने संस्थेच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागातर्फे एका आगळ्यावेगळ्या कट्टय़ाची सुरुवात करण्यात आली. ठाण्यात सुरू असलेल्या अत्रे कट्टय़ाचा आदर्श समोर ठेवून कोणत्याही विषयावर विद्यार्थ्यांनी कोणत्याही भाषेत कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादरीकरण करावे, असे या कट्टय़ाचे स्वरूप बनवण्यात आले आहे. सांस्कृतिक मंडळाचे समन्वयक प्रा. प्रकाश माळी यांनी ही माहिती विशद केली. तरुणांच्या पसंतीस उतरलेला जितू राज सभागृहात येताच तरुण-तरुणींनी एकच जल्लोष केला. जितू राजने या कट्टय़ाचे उद्घाटन केले. यावेळी सांस्कृतिक विभागाची औपचारिक सुरुवातही करण्यात आली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जितू राज यांनी निवेदन व रेडिओ जॉकी या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आवश्यक गोष्टीचे महत्त्व विशद केले. हजरजबाबीपणा, भाषेवरील प्रभुत्व आणि संवाद कौशल्य या पैलूंची मदत कशी होऊ शकते याकडे लक्ष वेधले. तसेच तरुणांनी प्रांत, भाषा, जात, धर्म या भेदांपलीकडे जाऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे व त्यामध्ये उत्तुंग भरारी घ्यावी असा संदेश दिला. तुमची शैक्षणिक संस्था व्यक्त होण्यासाठी एका स्वतंत्र कट्टय़ाची निर्मिती करून देते हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कला, संस्कृती व भाषेद्वारे आपण जनमानसांपर्यंत पोहोचतो व त्यातूनच सामाजिक विकासाला चालना मिळते. असे होत असेल तर ही एक गौरपूर्ण गोष्ट आहे, असे मत जितू राज यांनी व्यक्त केले.यावेळी कनिष्ठ आणि वरीष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पश्नांना त्याने उत्तरे दिली. तर काही विद्यार्थ्यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’, अनंतमूर्ती व सुधामूर्ती यांची पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी भाषा, कला आणि नृत्यनैपुण्याचा कला आविष्कार यावेळी सादर केला.
पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांचे तरुणांना मार्गदर्शन
आजची युवा पिढी ऐन तारुण्यात व्यसनाधीन होत असून या व्यसनांपासून युवा पिढीने चार हात लांबच रहावे, असे आवाहन उल्हासनगरच्या परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी केले. ते स्वातंत्र्यदिनानिमित्त बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात भारत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व रोट्रॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त बोलत होते. यावेळी बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक वांढेकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या तंबाखू निर्मूलन मोहिमेचे कैलास मालखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी यावेळी तरुणांशी संवाद साधला. आजचे महाविद्यालयीन तरुण हे जोशात येऊन सिगारेट, तंबाखू, गुटखा आदी पदार्थाचे सेवन करतात. नंतर मात्र त्यांना या नशेच्या पदार्थाचे व्यसन जडते. यामुळे तरुणांचे आयुष्य धोक्यात येते ही गंभीर बाब आहे. तसेच आहारी गेलेल्या तरुणांमुळे नशेच्या पदार्थाचा व्यापार करणाऱ्यांची वाढ होते. हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी तरुणांनीच नशेखोरी टाळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जाधव यांनी केले.Manthan
नृत्यकलेचा वेध घेणारा ‘मंथन’ कलाकारांच्या नर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध
लोकनृत्य, भरतनाटय़पासून हिप हॉप, बॉलीवूड, हॉलीवूड अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांवर नृत्याची कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमी अर्थात ‘माँ’ संस्थेच्या कलाकारांनी केला. शालेय वयातील लहानग्या मुलांपासून ते तरुणवयीन कलाकार घडवणाऱ्या या संस्थेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने नृत्याचा एक रंगतदार आविष्कार रसिकांना पाहता आला. या कार्यक्रमात कलाकारांनी २८ हून अधिक नृत्याविष्कार सादर केले. चिमुकल्या पायांनी आकर्षक लयबद्ध ठेक्याने रसिकांना मोहिनी घातली होती. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये नुकताच हा कार्यक्रम पार पडला.काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या अनेक लोकनृत्यांचे दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना घेता आले. त्यातील बांबू नृत्याचा कार्निव्हल प्रेक्षकांना अनुभवता आला. तर आदिवासी मुलांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कित्येक वर्षांच्या परंपरेनुसार बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रा आर्ट अकादमीने पुढाकार घेतला. याशिवाय नृत्य परीक्षेमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरवदेखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याकरिता मुद्रा आर्ट अकादमी संस्थेच्या संचालिका माया सावंत आणि संस्थेच्या सचिव तेजश्री सावंत यांचे योगदान अधिक महत्त्वपूर्ण राहिले. या कार्यक्रमाला संदूक चित्रपटाचे निर्माते मंदार केणी, माथेरान प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सावंत, नगरसेवक संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणे वाचन मंदिरात ‘आध्यात्मिक त्रिवेणी’ व्याख्यानाचे आयोजन
समाजाकडून वाटय़ाला आलेली उपेक्षा सहन करूनही आध्यात्मिक अधिकारासाठी मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई यांनी आत्मानुभूती व ईश्वरप्राप्ती साध्य केली. त्यांच्या भक्तीरसपूर्ण ओव्या, अभंग व आख्यानकाव्यांनी संत वाङ्मयात मोलाची भर घातली आहे, असे मत व्याख्यात्या मिनोती घारपुरे यांनी ठाणे नगर वाचन मंदिरतर्फे आयोजित त्रिवेणी कार्यक्रमात व्यक्त केले.
सध्या सुरू असलेल्या श्रावणमासाचे औचित्य साधून ठाणे नगर वाचन मंदिर संस्थेच्या वतीने मिनोती घारपुरे यांच्या त्रिवेणी या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई यांच्या जीवनातील काही प्रसंग व त्यांच्या काही अभंगांचे दाखले त्यांनी दिले.स्वानुभूतीचे व रसाळ असे साहित्य आजच्या धकाधकीच्या व अस्थिर जीवनात मन शांत आणि संतुलित ठेवण्यास महत्त्वाचे ठरते. मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई यांना वैयक्तिक प्रपंच नव्हता. तरीही अनेकांना भक्तीमार्गाचे धडे देऊन त्यांनी शिष्यवृंद तयार केला आणि समाजाचा प्रपंच केला. ईश्वरप्राप्तीप्रमाणेच अहंकारविरहित मन, संतसंग या त्यांच्या उपदेशाचा दैनंदिन आयुष्यात उपयोग व्हावा, असे मिनोती घारपुरे यांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले.कार्यक्रमासाठी ठाणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष केदार जोशी, ग्रंथालयाचे सभासद, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.