News Flash

परिश्रम करून यश मिळवा!

नव्या पिढीतील तरुणांनी आपल्यातील चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे

| August 20, 2015 03:25 am

परिश्रम करून यश मिळवा!
सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
ठाणे : नव्या पिढीतील तरुणांनी आपल्यातील चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येणारी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचे अनुकरण करत असते. त्यामुळे तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, अशी कामगिरी तरुणांनी करण्याची गरज आहे. आयुष्यातील ध्येय हे नेहमी मोठे असावे, त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करून मिळवलेले यश हेच महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी केले.
ठाणे वाहतूक पोलिसांच्या युवा सुरक्षा अभियानांतर्गत मुंब्रा येथील काळसेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेट वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी वाहतुकीचे नियम तरुणांकडून काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी जनजागृती करण्यात आली. या वेळी वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, परिमंडळ – १चे पोलीस उपायुक्त सचिन पाटील, सहायक पोलीस आयुक्त मठाधिकारी, विक्रम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरिक्षक संजय बुणगे, काळसेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोएब फिल्मवाला, उपप्राचार्य रावल आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. सह पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर डॉ. रश्मी करंदीकर यांनी वाहतुकीच्या नियमांची आवश्यकता विषद केली. दुचाकी चालवताना डोक्यावर हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. मात्र केवळ सक्ती आहे म्हणून हेल्मेट घालण्यापेक्षा आपले आयुष्य वाचवण्यासाठी ते घालणे गरजेचे आहे. त्यामुळे सण उत्सवांच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमध्ये हेल्मेटचाही समावेश करता येऊ शकतो, अशी सूचना त्यांनी या वेळी दिली.
नवे तंत्रज्ञान हे मिठासारखे असून त्याचा आवश्यकतेनुसार उपयोग केला तरच त्याचा खरा आनंद घेता येऊ शकेल. मात्र त्याचा अतिरेक केल्यास आयुष्य बेचव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमांवरील संकेत स्थळावर वेळ घालण्याऐवजी तो वेळ चांगल्या कामासाठी लावणे आवश्यक आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यांमध्ये भेटी देऊन त्याची माहिती करून घेणे गरजेचे आहे, असे आवाहन लक्ष्मीनारायण यांनी केले.

जे. ए. ई. महिला महाविद्यालयाची शांतता रॅली
डोंबिवली : अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासकी या दोन शहरांवर ७ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यामुळे ही शहरे बेचिराख झाली. अण्वस्त्रसाठा करणाऱ्या देशांनी (पर्यायाने भारतानेही) या गोष्टीची भीषणता लक्षात घ्यावी व मानवतेचे रक्षण होऊन सर्वदूर शांतता नांदावी तसेच येणाऱ्या नव्या पिढीलादेखील या भीषण घेटनेची जाणीव व्हावी यासाठी जे. ए. ई. महिला महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डोंबिवली शहरात अणुबॉम्बच्या विरोधात शांतता रॅली काढण्यात आली. या शांतताफेरीचे संचालन एनएसएसचे प्रमुख प्रा. सुनील घाडगे, प्रा. सुरेखा गायकवाड, माजी विद्यार्थिनी राणी गुप्ता, गौरी सोनटक्के यांनी केले. या फेरीत महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जपानमध्ये झालेल्या या अणुबॉम्ब हल्ल्याची जाणीव आत्ताच्या पिढीलाही व्हायला हवी. त्याचे दुष्परिणाम पाहता हे हल्ले होऊच नयेत म्हणून सर्व देशांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी या वेळी नोंदवल्या.

mulgiएस. एस. टी. महाविद्यालयात युवा कौशल्य विकास विभाग
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या समर्थ युवा कौशल्य विकास योजनेंतर्गत उल्हासनगरच्या एस. एस. टी. महाविद्यालयात युवा कौशल्य विकास विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरुसवानी उपस्थित होते. तरुणांमधील भावी उद्योजक तयार होण्यासाठी युवा कौशल्य विकास योजनेचा उपयोग होऊ शकतो या उद्देशातून महाविद्यालयात हा विभाग तयार करण्यात आला आहे. समर्थ युवा कौशल्य विकास योजना या विषयी घोषणा करताना नरेंद्र मोदी यांनी महाविद्यालयात अशा विभागाची स्थापना करण्याचे आवाहन केले होते. याच पाश्र्वभूमीवर एस.एस.टी. महाविद्यालयाने या विभागाची स्थापना करून विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्याचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. या विभागांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास करणे, लघु उद्योगाच्या स्थापनेसाठी मार्गदर्शन करणे यांसारखे उपक्रम घेतले जाणार आहेत.

महाविद्यालयात दहशतवादविरोधी प्रतिज्ञेचे वाचन
ठाणे : देशात वाढत चाललेल्या दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी दहशतवादविरोधी अभियानाची सुरुवात ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सह पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह या दहशतवादविरोधी प्रतिज्ञेचे वाचन करून या प्रतिज्ञेप्रमाणे कृती करण्याची शपथ घेतली.
ठाणे पोलीस मुख्यालयात १४ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम झाला. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या प्रतिज्ञेचे वारंवार वाचन करून त्याप्रमाणे कृती करावी. जेणेकरून दहशतवादास आळा घालण्यास मदत होईल हा यामागचा मुख्य हेतू आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सदर प्रतिज्ञेच्या प्रतींचे वाटप करण्यात आले असून त्यांनी त्यांच्या हद्दीतील सर्व महाविद्यालये व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांकडून त्याचे वाचन करून घेणार आहेत. तसे आदेशच त्यांना देण्यात आले आहेत. यापूर्वीही दहशतवादविरोधी अभियानांतर्गत ठाणे पोलीस आयुक्तलयामार्फत लघुपट बनवून तो सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस आयुक्त बोडखे, साहाय्यक पोलीस आयुक्त कदम, सामाजिक कार्यकर्ते उन्मेश जोशी, जनसंपर्क अधिकारी गजानन काब्दुले यांसह बांदोडकर महाविद्यालय व के. जी. जोशी कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

mulga
जीवनाचे अंतरंग दर्शवणारे पिक्चरेस्क
ठाणे : पर्यावरण, वन्य जीवन, ऊर्जा, हवा आणि पाणी या संदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर प्रकाशझोत टाकणारे आगळे वेगळे छायाचित्रप्रदर्शन ज्ञानसाधना महाविद्यालमध्ये भरविण्यात आले होते. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त महाविद्यालयातील बी.एम.एम. विभागातर्फे जनकवी पी. सावाळाराम सभागृहात छायाचित्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात ४०० हून अधिक छायाचित्रे स्पर्धकांनी पाठविली होती. त्यांपैकी निवडक १२० छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली. जंगलातील निसर्गसौंदर्य आणि वन्यजीवनाचा आनंद देणारे छायाचित्र, रस्त्यावरील जीवनगाथा मांडणारी छायाचित्रे, माणूसपणाच्या जाणिवा विस्तारणारे छायाचित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. या छायाचित्रप्रदर्शनात अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकारांचा यात समावेश होता. महाविद्यालयाचे संस्थापक सतीश प्रधान यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थेचे संचालक कमलेश प्रधान, महाविद्यालयाचे प्राचार्य सी. डी. मराठे, उपप्राचार्या भारती जोशी, प्रा. उमराणी, प्रा. हळदणकर आणि प्रमुख आतिथी प्रसिद्ध छायाचित्रकार धनेश पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते.
आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाचे आयोजन
ठाणे : ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन कोकण विभागीय कै. ग. का. फणसे स्मृती मराठी वक्तृत्व स्पर्धा, स. वि. कुलकर्णी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, जिल्हास्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. ‘देशाभिमानाच्या माझ्या संकल्पना’, ‘तरुणाईतील व्यसनाधीनता आणि जागृती’, ‘डिजिटल इंडिया : स्वप्न की वास्तव’, ‘शिक्षणाचे प्रयोजन : नोकरी, व्यवसाय की.’?, ‘पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील विनोद’ यांसारख्या विषयांवर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली.
ज्ञानसाधना महाविद्यालयाने सतीश प्रधान अमृत महोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. चंद्रकांत शिंदे, डॉ. शीतल पावसकर-भोसले, प्रा. अनिल बगाडे, चंद्रशेखर महाशब्दे, श्रीनिवास कुलकर्णी आदी मान्यवरांनी स्पर्धेचे परीक्षण केले. चित्रकला स्पर्धेत गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, तरण तलाव, ज्ञानसाधना महाविद्यालय इमारत या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली चित्रे रेखाटली. महाविद्यालयाचे कनिष्ठ आणि वरिष्ठ दोन्ही गट तसेच विविध शाळा मिळून सर्व स्पर्धासाठी एकूण ७५० विद्यार्थी सहभागी झाले होते. कमलेश प्रधान, प्राचार्य डॉ. सी. डी. मराठे, उपप्राचार्या विद्या लोणकर आदी यावेळी उपस्थित होते.

आदर्श महाविद्यालयाच्या स्वातंत्र्यदिन उपक्रमाची तपपूर्ती
बदलापूर : बदलापुरातील आदर्श महाविद्यालयाने राष्ट्रीय दिन जागृती अभियानांतर्गत शहरातील नागरी वसाहतींमध्ये जाऊन झेंडावंदन करण्याची परंपरा याही वर्षी कायम राखली. गेली तब्बल १२ वर्षे आदर्श महाविद्यालय हा उपक्रम राबवत आहे. स्वातंत्र्यदिनी महाविद्यालयाच्या वतीने दर वर्षीप्रमाणे याही वर्षी बदलापूर गाव, बल्लाळेश्वर सोसायटी, कल्याण वास्तू सभागृह, कुळगाव सोसायटी, पनवेलकर पार्क, गणेश चौक, मानव पार्क, सत्यम शिवम सुंदरम सोसायटी, पूर्वेकडील गणेश घाट आदी ठिकाणीे झेंडावंदन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 3:25 am

Web Title: campus news 2
Next Stories
1 वजन-मापे दलालावर गुन्हा दाखल
2 शहीद स्मारकाची अखेर डागडुजी
3 टिळकनगर पुनर्भेट संमेलनांची दशकपूर्ती
Just Now!
X