उत्पादन खर्च वाढला : मजूरही मिळेना

माहीम केळव्याची ‘काळीपत्ती’ रेल्वेद्वारे पाठवण्यास येथील बागायतदारांना येणाऱ्या अडचणींबरोबरच उत्पादन खर्च वाढल्याने ही शेती परवडत नसल्याचा सूर लावला आहे. शासनाने पुढाकार घेत मदतीचा हात दिला नाही तर या परिसरातील पानवेलीच्या बागा संपण्याच्या मार्गावर आहेत.

या परिसरात उत्पादित होणाऱ्या पानाला उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठी मागणी आहे. हे करण्यास येथील बागायतदारांना रेल्वेवर विसंबून राहावे लागत आहे. याचबरोबरीने पानवेलच्या बागायतीमध्ये अनेक समस्या भेडसावत आहेत. यात मजुरांची चणचण भासत असून दरडोही अडीचशे ते तीनशे रुपये मजुरी झाली आहे. महिलांना दीडशे रुपये मजुरी असून अपेक्षित कामही केले जात नाही अशी खंत बागायतदार व्यक्त करत आहेत.

जंगलात रानटी वेल म्हणून उगवणारा कारवी हा प्रकार नाजूक पानवेलीला आधार देण्यासाठी वापरण्यात येतो. ही कारवी जमिनीत रोवल्यानंतर त्यावर पनवेल चढवला जातो. वन विभागाने या कारवीच्या वाहतुकीवर र्निबध आणले असल्याने या कारवीची उपलब्धता कमी झाली आहे.  दरामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आहे. २० कारवीचा जुडीला सध्या ४५ ते ५० रुपये मोजावे लागत असून एक कारवी दोन ते अडीच रुपयांना मिळत आहे.  जंगलात लागणाऱ्या वणव्याला कारवीची सुकलेली झुडपे कारणीभूत असतात त्यांची योग्य वेळी तोड करणे आवश्यक आहे. जंगलाच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक असताना वन विभाग या झुडपाच्या वाहतुकीवर र्निबध का आणते? असा सवाल बागातदार करत आहेत.  प्लास्टिकची कारवीचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र ती  बागायतदारांना परवडत नाही, त्यामुळे शासनाने अनुदान द्यावे , पानवेलीचे उत्पादनात लागणारी मोरचूद, चुना व पेंडसारख्या वस्तूंवर शासनाने कर माफी व सवलत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

पानाच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, जागेच्या उपलब्धतेमुळे उत्पन्न घेण्याची मर्यादा, बाजारपेठेत असलेली स्पर्धा, मजुरीचे वाढलेले दर, वाहतुकीचा खर्च व रेल्वेवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नसल्याने माहीम केळव्याच्या बागायतदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

–  किसन राऊत, संचालक, माहीम पान उत्पादक संघ

पानवेलीच्या बागायतीमध्ये वेलाला पान वेचल्यानंतर काही काळानंतर गुंडाळून पुन्हा जमिनीमध्ये गाडण्यात येते. याला उतरवणी असे संबोधले जाते. या उतरवणीच्या कामाला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून तरुण पिढी या क्षेत्रात येत नसल्यामुळे  मनुष्यबळाची समस्या आहे.

– हरेश्वर पाटील, अध्यक्ष, केळवा पान उत्पादक संघ