काँग्रेसची कोकण विभागीय आयुक्तांकडे मागणी
विरोधी पक्षनेते पदावर दावा कुणाचा यावरून सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या दोन गटांत गोंधळ आणि हाणामारी होऊन त्याचा गैरफायदा उचलत शिवसेना-भाजपने विषय पत्रिकेवरील ४८ विषय अवघ्या १५ मिनिटांत मंजूर केले आहेत. हे विषय मंजूर करताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्या हिताचे काही विषय मंजूर करून घेतले आहेत. त्यामुळे सभेतील गोंधळात मंजूर केलेले ४८ विषयांचे ठराव विखंडित करावेत, अशी मागणी काँग्रेसने नगरविकास विभागाकडे केली आहे.कोकण विभागीय आयुक्तांनाही या प्रकरणी निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. गेल्या महिन्यातील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे हे शिवसेनेत गेल्याने, त्यांना विरोधी पक्षनेतेपदावर बसू देऊ नये. राणे यांनी शिवसेनेच्या बाजूला बसावे, अशी आग्रही मागणी करीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभेत गोंधळ घातला होता. शिवसेनेला अडचणीत आणण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न होता. राणे यांचे विरोधी पक्षनेते पद काढून घेतले, तर शिवसेनेची नामुष्की होती.त्यामुळे सेनेने सभागृहात मवाळ भूमिका घेतली होती. शिवसेनेच्या महापौर कल्याणी पाटील काँग्रेस नगरसेवकांची मागणी मान्य करण्यास तयार नव्हत्या.
विषयपत्रिकेवर बेकायदा बांधकामांची पाठराखण केली म्हणून ठपका बसून निलंबित झालेल्या प्रभाग अधिकारी रेखा शिर्के यांना पुन्हा सेवेत घेण्याचा, कल्याण केंद्राचे आरक्षण एक महिला बचत गटाला देण्याचा तसेच आर्थिक विषयाशी काही विषय पत्रिकेवर होते. या प्रस्तावांना होणारा विरोध लक्षात घेऊन महापौर पाटील यांनी सभागृहात गोंधळ सुरू असतानाही या गदारोळात सभा चालवून ४८ विषय पत्रिकेवरील विषय व सहा प्रशासनाच्या विषयावर कोणतीही चर्चा घडवून न आणता शिवसेना-भाजप नगरसेवकांच्या संमतीने मंजूर करून घेतले होते. स्वहित साधण्यासाठी ही सभा सभागृहात गदारोळ सुरू असताना चालू ठेवण्यात आली, असा आरोप काँग्रेसचे जिल्हा नेते संजय चौपाने यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक सदाशिव शेलार, प्रदेश नेते संतोष केणे यांनी नगरविकास विभाग, कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे.