शेवटच्या दिवशी तांत्रिक बिघाडाचे आव्हान? सुरळीत कामकाजाचा पालिकेचा दावा

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात उमेदवारांना तांत्रिक बिघाडाला सामोरे जावे लागत आहे. पालिकेचे संकेतस्थळावर अर्ज भरण्यास अडथळे निर्माण होत आहेत. यासाठी तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे केले जात आहे. तशा तक्रारी उमेदवारांनी केल्या आहेत. त्यातच बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, तसेच मनसे आदी पक्षांकडून शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे शुक्रवापर्यंत (३ फेब्रुवारी) बिघाड दूर करण्याचे आव्हान निवडणूक यंत्रणांना पेलावे लागणार आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया महापालिका निवडणूक प्रशासनाने सुरू केली आहे. येत्या तीन फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच ऑनलाइनद्वारे उमेदवारी अर्ज भरून तो सादर करणे बंधनकारक करण्यात आला आहे.

अशा अर्जाची एक प्रत पालिकेच्या निवडणूक विभागाकडे देणे सक्तीचे आहे. ऑनलाइनद्वारे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक विभागाने पालिका संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या पद्घतीमुळे उमेदवारांना घरबसल्याही अर्ज भरणे शक्य होत आहे.

हस्तलिखित अर्जामधील चुकांमुळे उमेदवारी अर्ज बाद होऊ नये म्हणून निवडणूक विभागाने ऑनलाइन पद्घत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पालिकेच्या संकेतस्थळावर निर्माण होणारा तांत्रिक बिघाड उमेदवारांची मोठी अडचण ठरली आहे.

२७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी अशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली असून बुधवापर्यंत १६ अर्ज दाखल झाले आहेत. अनेक इच्छुक उमेदवार ऑनलाइन प्रणालीबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांनी आता सायबर कॅफेची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. संकेतस्थळावर निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी निर्माण होत आहेत.

तांत्रिक बिघाड दूर

यादी गुरुवारी रात्री जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोंधळ उडू नये म्हणून सर्वच पक्षांतील उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच प्रतिज्ञापत्र तयार करून ठेवले आहे. तसेच गुरुवारी रात्री उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार हा अखेरचा दिवस मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी सर्वच पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करणार असून यादिवशीच संकेतस्थळावरील तांत्रिक बिघाड निर्माण झाला तर मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, ऑनलाइन अर्ज दाखल करताना यापूर्वी काही तांत्रिक बिघाड निर्माण झाले असले तरी ते दूर करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.