कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत पालिका निवडणुकीत प्रचारासाठी अधिक दिवस मिळाल्याने आनंद होण्यापेक्षा वाढत्या खर्चाने आणि होणाऱ्या धावपळीने उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे हैराण झाले आहेत. भर एप्रिलमध्ये निवडणुका असल्याने आधीच वाढत्या उष्म्यामुळे जीव मेटाकुटीस आलेला असताना त्यात प्रचाराचे दिव्य पार पाडावे लागत असल्याने कार्यकर्त्यां मंडळींना घाम फुटू लागला आहे. शारीरिक श्रमाने आणि आर्थिक भाराने अनेक उमेदवारांचे कंबरडे मोडले असून ते आता अक्षरश: प्रचाराची मुदत संपण्याची वाट पाहू लागले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ९ एप्रिलपासून प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली असली तरी माघार घेण्याचा ज्यांचा प्रश्न नव्हता, त्यांनी मार्च अखेरीलाच नारळ फोडले आहेत. तेव्हापासून संबंधित पक्षाचे पाठीराखे आणि थिंक टँकर्स प्रभागातील मतदार यादी घेऊन एकेक मताचा हिशेब लावत आहेत. उमेदवार त्या उमेदवाराला गाठून त्यांच्याशी व्यक्तिगत संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांत बहुतेक सर्व उमेदवारांनी आपापले प्रभाग अक्षरश: पिंजून काढले आहेत. प्रभागाच्या जाहीरनाम्यांचे घरोघरी वाटपही झाले आहे. प्रचार कार्यालये उघडण्यात आली आहेत. त्यामुळे आता मतदारांना पुन्हा नव्याने सांगण्यासारखे काहीही शिल्लक राहिलेले नाही. बहुतेक उमेदवार आतापर्यंत रॅलीद्वारे घरोघरी तीन-तीनदा पोचले आहेत. तरीही अजून निवडणुकीला एक आठवडा बाकी आहे. सोमवारी सकाळपर्यंत उमेदवारांना प्रचार करण्याची मुभा आहे. कडक उन्हामुळे दिवसभर शहरात अघोषित संचारबंदीच असते. पुन्हा भर दुपारी कुणाच्या घरी जाणे योग्यही ठरत नाही. त्यामुळे संध्याकाळ होताच पाठीराख्यांसह उमेदवारांचे जत्थे प्रभागामध्ये फेऱ्या मारू लागले आहेत. संख्याबळावर प्रतिसाद मोजला जात असल्याने संध्याकाळच्या रॅलीतील गर्दी कायम राखण्यासाठी उमेदवारांचे खिसे खाली होऊ लागले आहेत. मात्र खर्च वाचविण्यासाठी एखाद्या दिवशी प्रचार फेरीला दांडी मारूनही चालत नाही. कारण त्यामुळे पाठीराख्यांचा हिरमोड होण्याची भीती असते. आपण अशाप्रकारे गाफील राहिलो तर प्रतिस्पर्धी उमेदवार प्रभागात आपल्यापेक्षा अधिक प्रभाव टाकून जाईल, या असुरक्षिततेच्या भावनेने अनेकांनी प्रभागात अक्षरश: तळ ठोकला आहे. कोणत्याही क्षणी दगाफटका होऊन आपण जमविलेली मते प्रतिस्पर्धी फिरवू शकतो, या शक्यतेने उमेदवारांची झोपच उडालेली आहे.  

कार्यालयांमघ्ये शुकशुकाट
बहुतेक प्रचार कार्यालये तसेच त्यापुढे टाकण्यात आलेल्या मांडवांमध्ये दिवसभर शुकशुकाट असतो. संध्याकाळी सहानंतर गर्दी जमते. त्याच वेळी खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराचे रंग दिसतात. प्रचाराचा हा डामडौल उमेदवारांना भलताच महाग पडला आहे.  

पाच दिवस पुरेसे
प्रभागांची मतदार संख्या सरासरी पाच हजार असते. त्यामुळे संपर्क साधण्यासाठी पाच दिवस पुरेसे आहेत. त्यामुळे त्यापेक्षा अधिक दिवस प्रचारासाठी देता कामा नयेत. कारण निवडणूक प्रचार काळात विभागात असलेल्या सलोखा धोक्यात येण्याची शक्यता असते, असे मत एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याने व्यक्त केले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणेच होत असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.