नाल्याचा  परिसर स्वच्छ रहावा, त्याबाजूला लोकांनी कचरा टाकून तो घाण करु नये यासाठी फलक लावणे, लोकांना आवाहन करणे यासारख्या अनेक क्ल्युप्त्या यापुर्वी लढविल्या गेल्या आहेत. मात्र, वारंवार आवाहन करुनही नाल्याचा परिसर सुशोभीत होत नाही असा आजवरचा अनुभव आहे. हे लक्षात घेऊन गांधीनगर परिसरात महापालिकेच्या पुढाकाराने नाल्याच्या भिंतीवर झाडे लावून हा परिसर सुशोभित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आत्तापर्यंत फेसबूकवर पाहिलेला बाटल्यांमधील झाडांचे भिंतीवरील तोरण डोंबिवलीतील गांधीनगर नाल्याच्या भिंतीवर प्रत्यक्षात साकारले असून या प्रयोगाला नागरिक दाद देत आहेत.

फेसबूकवर मध्यंतरी पेप्सी, तसेच शीतपेयाच्या मोठय़ा बाटल्यांमध्ये छोटी झाडे लावून त्यांचे तोरण बनवून या झाडांनी घर आंगण सुशोभित करण्यात आल्याचे छायाचित्र फिरत होते. ते सर्वाना आवडत असल्याने अनेकांनी ते आपआपल्या मित्रांना पाठविले.

हा प्रयोग अत्यंत सोपा असून तो आपण घरी करु शकतो असे विचार त्यावर व्यक्त होत होते. परंतु तो कोणी राबविल्याचे पहाण्यात आले नाही. डोंबिवलीतील सुदेश चुडनाईक यांनी हा प्रयोग सत्यात उतरविण्याचे ठरविले. येथील गांधीनगर नाला नेहमीच प्रदुषित असतो. त्याच्या आजूबाजूला परिसरातील लोक घरातील कचरा आणून टाकत असत. यासाठी नाल्याच्या कठडय़ावर मोठी संरक्षक भिंत घालण्यात आली.

तरीही वाहनातून येजा करणारे नागरिक या भिंतीवरुन कचरा नाल्यात टाकण्याचा प्रयत्न करीत असत. त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य पसरत. या कचऱ्याच्या दरुगधीचा सामना परिसरातील नागरिकांनाच करावा लागत असे. हे सर्व थांबण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरुच होता. त्यातच फेसबूकवर अशा पद्धतीने झाडे लावलेला प्रयोग पाहिला.  त्यानुसार एकसमान दिसणाऱ्या एकाच रंगाच्या सुमारे तीन हजार बाटल्या जमविण्यात आल्या. त्या बाटल्या तारांनी एकमेकांना ठराविक अंतरावर बांधण्यात आल्या. त्यात शोभेची फुलझाडे लावली आणि पहाता पहाता ही भिंत हिरवीगार दिसू लागली आहे. आता येथून येणारी जाणारी लोक ही झाडे पाहून येथे कचरा फेकत नाहीत. फेसबूवकवर पहिल्यांदा हा प्रयोग पाहिला तेव्हा खुप छान वाटले. हाच प्रयोग परिसरातील आणखी काही ठिकाणी करावयाचा मानस चुडनाईक यांनी व्यक्त केला. या झाडांना रोज थोडे थोडे पाणी घातले तरी ती हिरवीगार रहातात, असा अनुभवही त्यांनी सांगितला.