08 March 2021

News Flash

बदलापुरात कारचालकाचा ताबा सुटल्याने अपघात

बदलापूर पूर्वेतील कात्रपच्या पुढचा भाग तसा कमी लोकवस्तीचा आहे.

एक ठार, एक जखमी

भरधाव वाहन चालवणे बदलापुरातील दोन तरुणांना महागात पडले असून चार चाकीवरचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. बदलापुरातील प्रस्तावित बदलापूर-पनवेल महामार्गावर हा अपघात झाला आहे.

बदलापूर पूर्वेतील कात्रपच्या पुढचा भाग तसा कमी लोकवस्तीचा आहे. येथूनच प्रस्तावित पनवेल महामार्गही जातो. लोकवस्ती कमी असल्याने आणि ऐसपैस रस्ता असल्याने येथे नवखे चालक वाहन शिकण्यासाठी येत असतात. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास भरधाव वेगाने चार चाकी चालवणाऱ्या दोन तरुणांचा वाहनावरील ताबा सुटल्याने चार चाकी रस्त्याच्या खाली जाऊन पडली. प्रत्यक्षदर्शीच्या मते चार चाकी इतक्या वेगात होती की रस्त्याच्या खाली उतरल्यानंतर चार चाकी दोन ते तीन वेळा पलटली. यावरून चार चाकीच्या वेगाचा अंदाज येऊ  शकतो. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, अपघातातील दोन्ही तरुणांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर दुचाकीवर स्टंटही केले जात असल्याची माहिती आता समोर येते आहे. रस्त्यावर वर्दळ नसल्याने अनेकदा येथे दुचाकींची शर्यतही लागलेली असते. तसेच अनेक तरुण गटागटाने येथे जमतही असतात. त्यामुळे अशा अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचे सुज्ञ नागरिक सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 1:13 am

Web Title: car accident at dombivali
Next Stories
1 डोंबिवलीत लाकडी गोदामाला आग
2 अटीतटीच्या लढतीत तिघांची मतदानाला दांडी
3 दोन कोटीच्या मालमत्ता १ रुपयात खरेदी
Just Now!
X