कल्याणच्या गणेशघाट स्मशानभूमीत वीज नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या एका कुटुंबाला वाहनांचे हेडलाइट लावून अंत्यसंस्कार पार पाडावे लागले. कल्याणच्या खडकपाडा भागात गवई कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाले. अंत्यसंस्काराठी मृतदेह गणेशघाट स्मशानभूमीत आणला गेला. मात्र त्यावेळी तिथे वीज गायब होती त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान नागरिकांनी या सगळ्या प्रकाराची तक्रार स्थानिक नेत्यांकडे केली. स्थानिक विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक यांनी या प्रकरणात लक्ष घातले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले. तेव्हा मुख्य स्विचमध्ये बिघाड झाल्याचे समजल्याने स्मशानभूमीत वीज नव्हती हे समजले आहे. तसेच वीज पुरवठा पुन्हा सुरु केल्याचेही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्य स्विचमध्ये काही काळ बिघाड झाला होता म्हणून लाइट नव्हते. आता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.