समाजात वावरताना कसे वावरायचे, कसे जगायचे याचे भान कुठे येऊ लागते न लागते तोच विद्यार्थ्यांसमोर करिअर हा मोठा प्रश्न उभा राहतो. कला, वाणिज्य, विज्ञान की आणखी काही वेगळी संधी निवडायची असा पेच प्रत्येकासमोर असतो. त्यातही स्वतची आवड पाहायची की आई-वडिलांची इच्छा पूर्ण करायची. विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील या शंका विचारात घेऊन टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, रेस्युमे मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि यू अ‍ॅण्ड व्ही इव्हेंटस् यांच्या वतीने डोंबिवलीत पुढील आठवडय़ात करिअर कट्टा आयोजित करण्यात आला आहे.
२६ ते २९ मेदरम्यान टिळकनगर शाळेत भरणाऱ्या या करिअर कट्टय़ात विविध क्षेत्रांतील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. आनंद म्हापुसकर, अमोल सराफ, देवेंद्र दाबके, चंद्रशेखर टिळक, मिलिंद कांबळे, डॉ. प्रसाद भिडे, वृशाली आठल्ये, समीर आठवले, ज्योती पाटकर, वृशाली दाबके, हेमंत महाजन, मनोज मेहता, उदय सबनीस, शिल्पा कशेळकर, मिलिंद आरोळकर, रवींद्र प्रभुदेसाई आदींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. या करिअर कट्टय़ाचे उद्घाटन सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते होईल. नावनोंदणीसाठी संपर्क- ०२५१/२४५५७५५, ९८३३५२१५४३.