15 August 2020

News Flash

तपास चक्र : एका पिशवीवरून..

भायखळा स्थानकातील सीसीटीव्ही तपासून काही दुवा मिळतोय का ते पाहायला सुरुवात केली.

सुहास बिऱ्हाडे  @suhas_news

suhas.birhade@expressindia.com

भायखळा स्थानकातून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासण्यास सुरुवात केली. मुलीचे अपहरण करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात येणार असे वाट असतानाच, या महिलेने पोलिसांना गुंगारा दिला. अशा वेळी पोलिसांसाठी सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसणारी एक पिशवी तपासाचा महत्त्वाचा धागा बनली.

१६ डिसेंबर २०१८ ची दुपार. शानू शेख ही महिला कामानिमित्त भायखळ्याला आली होती. सोबत तिची तीन वर्षांची मुलगी पिंकी होती. पिंकी खेळत असताना दोन लहान मुले आली आणि पिंकी त्यांच्यासोबत खेळू लागली. आपली मुलगी इतर मुलांसोबत खेळतेय हे पाहून शानू निर्धास्त होती. पंधरा मिनिटांनी ती परतली तेव्हा तिथे पिंकी नव्हती आणि ती दोन लहान मुले पण नव्हती. शानूच्या पोटात धस्स झालं. तिने आसपास शोध सुरू केला. पण पिंकी काही दिसेना. मुलीच्या विरहाने कासावीस झालेली शानू धावतच भायखळ्याच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यावेळी संध्याकाळचे ४ वाजले होते. मूल पळविण्याच्या घटनांचे गांभीर्य पोलिसांना माहीत होते. पोलिसांनी शानूला धीर दिला आणि त्वरित पिंकी बेपत्ता झाली त्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी एक बुरखाधारी महिला चिमुकल्या पिंकीला घेऊन स्थानकात जात असलेली दिसली. सोबत तीच दोन लहान मुले होती. म्हणजे त्या अपहरणकर्त्यां महिलेने दोन लहान मुलांच्या साथीने चिमुकल्या पिंकीला पळवून नेले होते.

आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमित बाबर यांच्याकडे वरिष्ठांनी या संवेदनशील प्रकरणाचा तपास सोपवला. पोलिसांनी पथके बनवली आणि तिचा शोध सुरू केला. प्रत्येक मिनिट महत्त्वाचे होते. पोलिसांनी सीसीटीव्हीची जुळवाजुळव करून त्या अज्ञात महिलेचा माग घेण्यास सुरुवात केली. ती महिला तीन लहान मुलांसह भायखळा स्थानकात जात असलेली सीसीटीव्हीत दिसून आली. पोलिसांनी मग फलाटावरील सीसीटीव्ही धुंडाळले. फलाटावरील सीसीटीव्हीने साथ दिली. अपहरणकर्ती महिला दिसली खरी, पण ती खोपोली ट्रेनमध्ये तीन मुलांसह शिरत असल्याचे दिसले. ती कुठे जाणार हे माहीत नव्हते पण ट्रेनमध्ये चढल्याचे नक्की झाले होते. ही खोपोली ट्रेन दादर, ठाणे, कल्याण येथे थांबते. या स्थानकात तिला गाठणं शक्य होतं.

पोलिसांनी या सर्व स्थानकांतील रेल्वे पोलिसांना सूचना दिल्या. पोलिसांनी या प्रत्येक स्थानकातील सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. वेळ भराभर पुढे जात होता. जास्त उशीर झाला असता तर महिला कायमची निसटली असती. पोलिसांना कल्याण रेल्वे स्थानकात ही महिला उतरताना सीसीटीव्हीत दिसली. तिची हालचाल प्रत्येक सीसीटीव्हीने टिपली होती. पण कल्याण स्थानकातून ती बाहेर न पडता ती महिला रात्री पावणे अकराच्या कन्याकुमारी गाडीत चढताना दिसली. पोलिसांना ही माहिती मिळाली तेव्हा रात्रीचा एक वाजून गेला होता. खूप उशीर झाला होता. मात्र ही महिला रेल्वेगाडीमध्ये असल्याने तिला पकडणे सोपे जाणार होते. पोलिसांच्या जिवात जीव आला. त्यांनी कुर्डुवाडी स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाला या महिलेचा आणि चिमुकल्या पिंकीचा फोटो दिला. गाडी कुर्डुवाडी स्थानकात आली. पोलीस आधीच दबा धरून बसले होते. गाडी थांबवून ठेवण्याच्या सूचना दिल्या. पोलीस पथकाने गाडीचा प्रत्येक डबा सखोल तपासला. पण गाडीत ती महिला दिसली नाही. पोलिसांनी प्रत्येक प्रवाशांकडे चौकशी केली. तेव्हा काहींनी ही महिला गाडीत होती पण तीन मुलांना घेऊन पुण्याला उतरल्याची माहिती दिली. हातात येऊ  पाहत असलेली आरोपी महिला थोडक्यात निसटली होती. पोलिसांनी मग पुण्यात जाऊन तिकडचे सीसीटीव्ही पाहिले. तर ती महिला आधीच पुण्याला उतरल्याचे दिसले. पोलिसांनी लगेच आसपासचे सर्व सीसीटीव्ही तपासले पण कुठेच ही महिला दिसली नाही.. पोलिसांची निराशा झाली. अपहरण करणारी महिला पुणे शहराच्या गर्दीत गायब झाली होती.

आता चिमुकल्या पिंकीला शोधायचं कस? हा यक्ष प्रश्न पोलिसांपुढे होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी प्रयत्न केला पण अपहरण करणाऱ्या महिलेने पोलिसांना असा गुंगारा दिला होता की, पुन्हा ती दिसणं शक्य नव्हतं. त्यात तिने बुरखा परिधान केला असल्याने तिचा चेहराही दिसत नव्हता. पिंकीची आई पोलीस ठाण्यात धाय मोकलून रडत होती. एका आईची लहानगीशी झालेली ताटातूट, तिचा विलाप पोलिसांना बघवत नव्हता. पोलिसांनी हिंमत ढळू न देता नेटाने पुन्हा तपास सुरू केला.

भायखळा स्थानकातील सीसीटीव्ही तपासून काही दुवा मिळतोय का ते पाहायला सुरुवात केली. इच्छा असली की मार्ग सापडतो असे म्हणतात. पोलिसांना त्या सीसीटीव्ही चित्रणात अपहण करणाऱ्या महिलेच्या हातात एक पिशवी दिसली. त्या पिशवीवर ‘लूट वन’ ही अक्षरे होती. पोलिसांनी लगेच आसपासचे ‘लूट वन’ हे दुकान शोधायला सुरुवात केली. ते कपडय़ांचे दुकान भायखळ्यालाच सापडले. पोलीस लगेच दुकानात धडकले. दुकानदाराने या महिलेला पिशवी दिली होती. तिने काही खरेदी केली नाही, मात्र पिशवी मागितल्याने दुकानातील कर्मचाऱ्याने विनामूल्य पिशवी दिल्याचे तपासात समजले. दुकानातील एका कर्मचाऱ्याने एक माहिती दिली. पिशवी घेतल्यानंतर ही महिला शेजारच्या पीसीओवरून बराच वेळ बोलत होती. पोलिसांना एवढा दुवा पुरेसा होता.

पोलिसांनी त्या पीसीओवरून दुपारच्या वेळेत केलेल्या फोनचे सीडीआर काढले. ज्या नंबरला अपहरण करणाऱ्या महिलेने फोन केला होता तो हैदराबादचा होता. पोलीस हैदराबादला धडकले. त्या नंबरचे मोबाइल टॉवर लोकेशन काढले. तर हा फोन सैफाबाद येथील होता. मग पोलीस स्थानिकांच्या मदतीने तो फोन असलेल्या रेश्मा नावाच्या महिलेकडे पोहोचले. दुपारी तिची नणंद सकीनाचा फोन आल्याचे तिने सांगितले. मात्र तिला मुलीच्या अपहरणाबद्दल माहिती नव्हती. सकीना पुण्यात राहते एवढीच माहिती दिली. पिंकीला पळवणारी महिला सकीना होती आणि ती पुण्यात राहते एवढी माहिती मिळाली. पोलिसांचे पुढचे काम सोपे झाले होते. सकीनाचा एक मोबाइल पोलिसांना मिळाला. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि ते सकीनाच्या दारात धडकले. सकीनाने पळवून आणलेल्या पिंकीला दिराकडे दिले होते. पोलिसांनी सकीनाला आणि जिच्याकडे पिंकीला ठेवली ती नणंद फातिमाला अटक केली. तिच्याकडे चिमुकली पिंकी सुखरूप होती. पोलिसांनी पिंकीला सुखरूप आईच्या ताब्यात दिले. अवघ्या ४८ तासात शबानाचा शोध लावून आरोपी महिलांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. शबाना आईला बिलगली. आई आणि लेकीच्या भेटीच्या हृदयस्पर्शी प्रसंगाने उपस्थित पोलीस हेलावले आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा आनंदाने ओलावल्या. पोलीस उपनिरीक्षक अमित बाबर, अर्जुन कुदळे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हौसनूर यांच्या पथकाने अशक्य वाटणारे हे आव्हान अवघ्या ४८ तासात यशस्वी करून दाखवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:13 am

Web Title: carry bag help mumbai police to solve byculla kidnapping case zws 70
Next Stories
1 घातक ‘भाजीमळे’ उद्ध्वस्त करणार!
2 घोडबंदरचा पाणीपुरवठा १० दिवसांत सुरळीत
3 ‘इंद्रधनू रंगोत्सव’मध्ये डॉ. लागूंना आदरांजली
Just Now!
X