वसई राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, शिवसेना, भाजप नेत्यांसह १६ जणांविरुद्ध गुन्हे

बांधकाम व्यावसायिकांकडून दीड कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्यांविरोधात पोलिसांनी एकाच वेळी मोठी कारवाई केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई जिल्हाध्यक्ष गोविंद गुंजाळकर यांच्यासह पाचजणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांत शिवसेनेचे रमेश मोरे, उदय जाधव, नितीन पाटील आणि कल्पेश राठोड यांचा समावेश आहे. भाजप, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह अन्य ११ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले असून ते फरारी आहेत. गुंजाळकर यांची जामिनावर सुटका झाली आहे.

वसई-विरार भागांत मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे होत असल्याचा आरोप आहे. अशी बांधकामे करणाऱ्यांकडून माहिती अधिकारात माहिती मागवून खंडणी उकळण्याचे प्रमाण वाढल्याचाही आरोप होत आहे. त्यानुसार पालघर जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी रात्री एकाच वेळी तुळींज, नालासोपारा आणि विरार पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल  केले. त्यात शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे याच्यावर तुळींज आणि विरार पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपचे वसई विरार जिल्हा युवाध्यक्ष अरूण सिंग, व्हीएन फाऊंडेशनचे अशोक दुबे, श्रध्दा जाधव, उदय जाधव, विनित मिश्रा यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. हे सर्वजण फरारी आहेत. यात माहिती अधिकार कार्यकर्ते, समाजसेवक आणि पत्रकार यांचाही समावेश आहे.

याबाबत माहिती देताना पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, आमच्याकडे अनेक बांधकाम व्यावसायिकांचे तक्रार अर्ज आले होते. त्यानुसार आम्ही तक्रारींची शहानिशा करून पुरावे गोळा केले आणि ही कारवाई सुरू केली. चार प्रकरणांत दीड कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.

विशेष पथक स्थापन : माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करीत बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन झाले आहे. सर्व बांधकाम व्यावसायिकांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली  असून कुणी किती पैसे घेतले याची माहिती गोळा  केली जात आहे. ही कारवाई सुरूच राहील, असे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले.