रास्त दर धान्यविक्री दुकानांमधील अनियमितता आणि मनमानी कारभारामुळे खरे लाभार्थी जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित राहतात. त्यामुळे जिल्ह्य़ातील असे झारीतील शुक्राचार्य शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार भिवंडी तालुक्यातील पडघा येथे एका गॅसच्या एजन्सीविरुद्ध तसेच मुरबाड तालुक्यातील सरळगाव, अंदाड येथे एका केरोसीन विक्रेत्यावर जिल्हापुरवठा विभागाने गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीपुरवठा अधिकारी मोहन नळदकर यांनी दिली.
पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडघा येथे भेट दिली असता तेथील धनलक्ष्मी साडी सेंटर येथे चौधरी गॅसच्या नावाने अनधिकृतरीत्या गॅसचा व्यापार सुरू असल्याचे आढळले. या दुकानात २ सिलेंडर्स आणि त्या दुकानाच्या वाहनामध्ये २४ सिलेंडर्स ठेवलेले दिसले. तहसीलदार वैशाली लंबाते यांनी या दुकानाचा मालक भीमराव चौधरी आणि इंद्रदीप गॅस एजन्सीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला. शहापूरजवळील अंदाड येथे केरोसीन परवानाधारक आत्माराम पंडित हे नियमानुसार केरोसिनचे वाटप करीत नसल्याची तक्रार होती. त्यावरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुरबाड तालुक्यातील ब्राह्मणगाव आणि गवाळी येथील रास्त भाव दुकानांवरही धान्य उचल वेळेवर न केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले. शहापूरमधील आवळे गावातील एका दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे.