22 November 2017

News Flash

वसईतील ख्रिस्तायण : आळ्या आणि क्रुसाची वेस

आजही वसईत फिरताना गावांत शिरल्यावर काही विशिष्ट अंतरावर दगडाचे किंवा लाकडाचे क्रूस दिसतात.

दिशा खातू  | Updated: September 12, 2017 1:37 AM

वसईत पोर्तुगीजांचे आगमन झाल्यांनतर ख्रिस्ती समाजानेही आपली स्वतंत्र वस्ती वसवली.

वसईच्या ख्रिस्ती समाजजीवनाच्या रचनेत आळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ख्रिस्ती कुटुंब समूह ज्या ठिकाणी वेगवेगळ्या घरांत राहतो त्या भागाला आळी असे म्हणतात. प्रत्येक आळीला वेस असते आणि तेथे क्रूस असतो. हीच वेस प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेली असते. पंचवीस-तीस आळ्या मिळून धर्मग्राम (पॅरीश) तयार होतो. कशा असतात या आळ्या आणि त्यांनी कसे निगडित असते ख्रिस्ती समाजजीवन त्याचा हा आढावा.

एकेकाळी माणूस गटा-गटाने भटकंती करत आपले जीवन जगत होता. कालांतराने तो स्थिरावला अन् एकाच ठिकाणी राहू लागला. तेव्हा मानवी समूहाने एकत्र येऊन वस्ती वसवली. वसईत पोर्तुगीजांचे आगमन झाल्यांनतर ख्रिस्ती समाजानेही आपली स्वतंत्र वस्ती वसवली. ते समूहाने एकत्र राहू लागले. संपूर्ण कुटुंबाचा समूह एकत्र राहतो त्या जागेला आळी असे संबोधतात. पूर्वीपासूनच आळी वसईचा भाग राहिलेली आहे. याच आळी संस्कृतीत मग ख्रिस्ती समाजाच्या आळींचा समावेश झाला. सुमारे ५०० वर्षांपासून ख्रिस्ती आळ्यांचे अस्तित्व वसईत आहे. आळी हा परंपरेने वापरण्यात येणारा शब्द आहे.

आजही वसईत फिरताना गावांत शिरल्यावर काही विशिष्ट अंतरावर दगडाचे किंवा लाकडाचे क्रूस दिसतात. त्यापुढे दाटी-वाटीने किंवा एका सरळ रेषेत घरे दिसतात. क्रूस असलेले ठिकाण म्हणजे वेश आणि घरे असलेले ठिकाण म्हणजे आळी. क्रूस हे ख्रिस्ती लोकांच्या वस्तीचे प्रतीक आहे. आळीला सामवेदी (कुपारी) समाजात भाट किंवा आळी, सोमवंशी (वाडवळ) समाजात वाडी, ईस्ट इंडियन समाजात पखाडी किंवा ओळी किंवा वळ, कोळी समाजात बंदर (बंदरावरची वसाहत) आणि आदिवासी समाजात पाडा या नावांनी संबोधले जाते. प्रत्येक आळीला एक स्वतंत्र नाव असते, परंतु ती आळी विशिष्ट आडनावानरून ओळखली जाते. एकाच कुटुंबातील विभक्त झालेल्या लोकांची घरे येथे आढळतात. काही अपवाद वगळता सर्वाची आडनावे समान असतात. उदा. आल्मेडा आळी, मोत आळी, डाबरे आळी, डिसोजा आळी, मेर भाट, सित्तरभाट, पाटलार वाडी इत्यादी.

धर्मग्रामचे उपफाटे म्हणजे आळी होय. एका आळीत साधारणत: पंचवीस ते तीस घरे असतात. अशा पंचवीस-तीस आळ्या एकत्र आल्यावर एक पॅरीश म्हणजेच धर्मग्राम (गाव) तयार होते. येथील स्थानिक लोक त्यांच्या या वस्तीलाच गाव असे म्हणतात. आळीचा रस्ता मुख्य धर्मग्रामच्या रस्त्याला जोडलेला असतो. प्रत्येक आळीला म्हणजेच गावाला वेस असते. त्या वेशीच्या म्हणजेच क्रुसाच्या पुढे दुतर्फा घरे असतात. ख्रिस्ती समाजाची त्यांच्या वेशीवर दृढ मान्यता आहे. त्यांच्या जीवनाची सुरुवात आणि शेवट त्या वेशीवरूनच होते असे म्हणतात. मूल जन्मल्यानंतर त्याचा नामकरणविधी झाला की त्याचे आई-वडील त्याला वेशीजवळ आणतात. क्रुसाची पूजा करून आशीर्वाद घेतात. आता या आळीशी तुझा आयुष्यभराचा संबंध आहे, असे सांगण्यासाठी ते विधीपूर्वक तेथे भेट देतात. तसेच, तेथील व्यक्तीचा अंत्यविधी होण्यापूर्वी त्यास वेशीच्या क्रुसाजवळ नेले जाते. आळीतील व्यक्ती स्वत: अंत्यविधीची तयारी करतात. तेव्हा त्या प्रत्येक घरात दुखवटा असतो. प्रत्येक जण प्रत्येक घराच्या सुख-दु:खात आपलेपणाने सहभागी होतो. आळीतील लोका रात्री-अपरात्री केव्हाही मदतीसाठी धावून येतात. विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले तरी त्यांना क्रुसाजवळ आणले जाते. सर्व आळीतील लोक एकत्र येतात, कौतुक करतात. जीवनातील महत्त्वाचा टप्पा विवाह, याप्रसंगीदेखील वधू लग्नापूर्वी माहेरच्या आळीच्या वेशीवर जाऊन आशीर्वाद घेते. तसेच लग्न झाल्यावर सासरी वरात निघते त्या वेळी ती वरात वेशीवरून नेली जाते. वेशीच्या क्रुसावर सुखी जीवनासाठी आशीर्वाद घेतला जातो. हार किंवा फुले वाहून क्रुसाची पूजा केली जाते. या आळीशी आणि याच वेशीशी तिचे पुढचे संपूर्ण जीवन जोडले जात असते. आळी ही प्रत्येकाच्या सुख-दु:खाची साक्षीदार आणि साथीदार असते असे येथील लोक अभिमानाने सांगतात. रविवारच्या प्रार्थनेला मात्र पॅरिशमधील सर्व आळींतील लोक एकत्र येतात आणि प्रार्थना करतात.

मॉन्सेनिअर फादर फ्रान्सिस कोरीया माहिती देतात की, ‘साधारणपणे शंभर एकर जमिनीवर आळ्या पसरलेल्या असतात. नित्यनेमाने क्रुसाची पूजा-अर्चना होत असते. त्या क्रुसाजवळ मागणेदेखील सांगितले जाते.’ आळीतील घरे ही भव्य, कौलारू, दगड-चुन्याची, ओटा-पडवी असलेली असत. आता अगदी क्वचित अशी घरे पाहायला मिळतात. घरांवर येशूची किंवा ख्रिस्ती समाजाशी संबंधित चित्रे फळीवर असतात. ही चित्रे लाकडात कोरलेली असतात. क्रूस, द्राक्षे यांसारखी प्रतीके तर येशू, मेरी यांच्या प्रतिमा इत्यादी गोष्टी फळीवर कोरण्यात आलेले आहेत. प्रत्येक आळीत कमीत-कमी दोन ते तीन बावखले असत. भाजीपाल्याच्या उत्पादनात, बागायतीसाठी त्यांतील पाण्याचा वापर होत असे.

आळीमध्ये क्रुसाजवळ वार्षिक महोत्सव होतात. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे बोलवतात. या वेळी आळीतील मुले शिक्षण, नोकरीसाठी परदेशात गेलेली असतील तर त्यांना विशेष बोलावले जाते. सर्व जण आवर्जून या महोत्सवाला उपस्थित राहतात. लहान मुलांसाठी चित्रकला, निबंधलेखन, वक्तृत्व इत्यादी स्पर्धाचे आयोजन केले जाते. मुलांचा गुणगौरव सोहळा, आळीतीतील महत्त्वाच्या व्यक्तींचे तसेच सामाजिक कार्य करणाऱ्यांचेही सत्कार केले जातात. संगीत-नृत्याचा कार्यक्रम करतात. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, नाताळ तसेच इतर सर्व सण येथेच साजरे केले जातात. नाताळ सणानिमित्त चर्चकडून नाताळगोठे बनविण्यासाठी विषय दिला जातो. तेंव्हा अनेक आळीतील लोक एकत्र येऊन त्यावर काम करतात आणि सण एकत्र साजरा करतात.

आता या आळीचे स्वरूप बदलले आहे. लोकसंख्यावाढीमुळे आळींच्या संख्या वाढलेल्या आहेत, गावे छोटी झाली आहेत, घरांची रचना बदलली आहे, अनेक लोक इतर ठिकाणी स्थायिक झालेले आहेत इत्यादी. बदल झाले तरी वसईतील ख्रिस्ती समाजातील आळीचे आणि वेशीचे महत्त्व कमी झालेले नाही.

दिशा खातू @Dishakhatu

disha.dk4@gmail.com

First Published on September 12, 2017 1:37 am

Web Title: catholic community in vasai structure of christian life in vasai